११४ गावांना अलर्ट़़़
By Admin | Updated: July 7, 2014 00:21 IST2014-07-07T00:10:16+5:302014-07-07T00:21:13+5:30
नांदेड : जिल्ह्यात दूषित पाणीपुरवठ्याबाबत आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना सतर्कतेचे आदेश दिले आहेत़ मे २०१४ मध्ये जि़ प़ ने घेतलेल्या २१५६ पाणी नमुन्यांपैकी ६०५ नमुने दूषित आढळले आहेत़

११४ गावांना अलर्ट़़़
नांदेड : जिल्ह्यात दूषित पाणीपुरवठ्याबाबत आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना सतर्कतेचे आदेश दिले आहेत़ मे २०१४ मध्ये जि़ प़ ने घेतलेल्या २१५६ पाणी नमुन्यांपैकी ६०५ नमुने दूषित आढळले आहेत़ यात ग्रामीण भागातील ५५९ तर शहरी भागातील ४६ दूषित नमुन्यांचा समावेश आहे़
जिल्ह्यात साथरोगांना आळा बसावा यासाठी जिल्ह्यात मान्सूनपूर्व उपाययोजना आरोग्य विभागाच्या वतीने हाती घेण्यात आल्या आहेत़ साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कृती योजनाही हाती घेण्यात आली असून जिल्ह्यातील ३९ गावे साथ जोखीमग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत़ मागील तीन वर्षांच्या काळात जलजन्य साथउद्रेक उद्भवलेली, मोठी यात्रा भरणारी आणि एकच पाण्याचा स्त्रोत असलेल्या गावांचा साथरोगदृष्ट्या जोखीमग्रस्त असलेल्या गावांचा समावेश आहे़ याशिवाय टंचाईग्रस्त, टँकरने पाणीपुरवठा होत असलेली गावे आणि नदीकाठच्या गावांनाही जोखीमग्रस्त समजण्यात येईल, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे़
या गावांची यादी तयार करून जिल्ह्यात ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि ३७७ उपकेंद्रांना देण्यात आली आहे़
या जोखीमग्रस्त गावात साथ प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत पाणीस्त्रोतांचे परीक्षण करावे, परीक्षणात तपासणीचा अहवाल नकारात्मक असेल तर पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेस सतर्क करण्याचेही आदेश दिले आहेत़
संबंधित ग्रामपंचायतीमध्ये ब्लिचिंग पावडर पुरेशा प्रमाणात असल्याची खात्री करावी, टँकरने होणारा पाणीपुरवठा शुद्ध आहे की नाही याची खात्री करावी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी किमान १५ दिवसांतून एकदा तरी अशा गावांना भेट देवून माहिती घ्यावी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधीसाठा तपासावा आणि साथउद्रेक उद्भवल्यास उद्रेकाची माहिती मुख्यालयाला कळविण्याबाबत सूचना दिल्या आहेत़ मे महिन्यात आरोग्य विभागाने पाणीनमुने संकलीत करून त्याची तपासणी केली होती़
त्यात ग्रामीण भागातील १६३७ नमुन्यांपैकी ५५९ नमुने दूषित आढळले आहेत़ तर शहरी भागातील ५१९ नमुन्यांपैकी ४६ नमुने दूषित आढळले़ (प्रतिनिधी)
सर्वाधिक ३४ गावे नांदेड तालुक्यातील
पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत मान्सूनपूर्व स्वच्छता सर्वेक्षणात जिल्ह्यातील ११४ गावे तीव्र जोखीमग्रस्त आढळले आहेत़
विशेष म्हणजे यात सर्वाधिक ३४ गावे हे नांदेड तालुक्यातील आहेत़ त्याखालोखाल मुखेड तालुक्यातील २५, मदुखेड तालुक्यातील १९, हिमायतनगर तालुक्यातील १७, नायगाव ८, कंधार, किनवट, अर्धापूर तालुक्यातील प्रत्येकी तीन गावांचा समावेश आहे़
या अहवालात जिल्ह्यातील ६५३ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले आहेत़ तर ६५६ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले आहेत़ लाल कार्ड अर्थात धोकादायक अशी एकही जिल्ह्यातील ग्रामपंचायत ठरली नाही़