ग्राहकांकडे १ कोटी ९३ लाखांची वीजबिल थकबाकी
By Admin | Updated: July 19, 2014 00:45 IST2014-07-19T00:23:14+5:302014-07-19T00:45:19+5:30
किनवट : तालुक्यातील ५ हजार ९८९ कृषीपंपधारकांकडे मुद्दल, व्याज व दंडासह ३१ कोटी ५० लाख रुपये थकबाकी आहे. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा २२ हजार १०० ग्राहकांकडे १ कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकी आहे

ग्राहकांकडे १ कोटी ९३ लाखांची वीजबिल थकबाकी
किनवट : तालुक्यातील ५ हजार ९८९ कृषीपंपधारकांकडे मुद्दल, व्याज व दंडासह ३१ कोटी ५० लाख रुपये थकबाकी आहे. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा २२ हजार १०० ग्राहकांकडे १ कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकी आहे. शहरातील वीज ग्राहकांकडे ५० टक्के बाकी असल्याने थकबाकीचा भरणा न केल्यास किनवट शहरावर भारनियमनाची शक्यता आहे.
तालुक्यात ६ हजार ६४८ कृषी पंपधारक असून पैकी ५ हजार ९८९ कृषीपंपधारक हे थकबाकीदार आहेत. मुद्दल, व्याज, दंडापोटी ३१ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी कृषी पंपापोटी असल्याची माहिती हाती आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने कृषी ग्राहकांकडील वीजबिल थकबाकीमध्ये सवलत देण्यासाठी कृषी संजीवनी योजना- २०१४ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत कृषी ग्राहकांचे ३१ मार्च २०१४ रोजी थकित असलेले पूर्ण व्याज व दंड महावितरण कंपनीतर्फे माफ करण्यात येणार आहे. तर मूळ रकमेच्या ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन हप्त्यात भरण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार पहिला हप्ता २० टक्के ३१ आॅगस्ट २०१४ पर्यत, दुसरा हप्ता ३० सप्टेंबरपर्यंत, ३१ आॅक्टोबरपर्यंत कमीत कमी १० टक्के रक्कम तिसरा हप्ता भरण्यासाठी सवलत दिली आहे. या योजनेअंतर्गत १७ कोटी रुपये व्याज, दंडापोटी १४ कोटी १५ लाख रुपये मुद्दल रकमेपोटी माफ होणार आहे. आता कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ७ कोटी ७ लाख रुपयेच कृषी पंपधारकांना भरावे लागणार आहेत. यामुळे आता २४ कोटी ४३ लाख रुपये या योजनेत भाग घेतला तर माफ होणार आहेत, अशी माहिती सहायक अभियंता व्ही. पी. जोगी यांनी दिली.
तालुक्यातील २० हजार ६०० घरगुती वीज ग्राहकांकडे १ कोटी ६२ लाख रुपयांची, व्यवसायिक १ हजार २०० ग्राहकांकडे २३ लाख रुपयांची व औद्योगिक ३०० ग्राहकांकडे ८ लाख ४० हजार रुपयांची अशी एकूण २२ हजार १०० ग्राहकांकडे १ कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकी आहे. वसुलीसाठी लवकरच मोठी वसुली मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही जोगी यांनी सांगितले. (वार्ताहर)