११०० लाभार्थ्यांचे ठसेच उमटेनात
By Admin | Updated: May 11, 2017 23:31 IST2017-05-11T23:27:04+5:302017-05-11T23:31:43+5:30
बीड : तालुक्यातील १७ हजारावर निराधारांचे मानधन वाटप सुरू आहे. मात्र, ११०० लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने बँक कर्मचारी मानधन देण्यास नकार देत आहेत.

११०० लाभार्थ्यांचे ठसेच उमटेनात
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : तालुक्यातील १७ हजारावर निराधारांचे मानधन वाटप सुरू आहे. मात्र, ११०० लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने बँक कर्मचारी मानधन देण्यास नकार देत आहेत. परिणामी लाभार्थी तहसील कार्यालयात चकरा मारत असल्याचे चित्र गुरूवारी पहावयास मिळाले.
आता निराधारांचे मानधन बायोमॅट्रीक पद्धतीने वाटप केले जाते. मागील आठ दिवसांपासून बीड तहसील कार्यालयात मानधन वाटपाचे काम सुरू आहे. क्षुल्लक त्रुटीवरून प्रस्ताव धूळ खात पडून होते. हे प्रस्ताव आता तहसील प्रशासनाने निकाली काढले आहेत. मात्र, आता नवीन समस्या निर्माण झाल्यामुळे निराधारांची मोठी हेळसांड होत आहे. बायोमॅट्रीक पद्धतीने मानधन सुरू असल्याने अंगठ्याचे ठसे घेतले जातात. निराधारांमध्ये वृद्ध व मजुरी करणाऱ्यांचा समावेश असल्याने त्यांच्या बोटांचे ठसे बायोमॅट्रीकमध्ये उमटत नाहीत. त्यामुळे मानधन देताना संबंधित लाभार्थ्याची ओळख पटत नसल्याचे बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
याबाबत तहसीलदार छाया पवार यांनी सांगितले की, ज्या लाभार्थ्यांचे ठसेच उमटत नाहीत त्यांच्या संदर्भात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
असे असले तरी सध्या भर उन्हात बीड तालुक्यातील निराधार, परित्यक्त्या, विधवा यांच्या तहसील कार्यालयात चकरा वाढल्या असल्याचे चित्र आहे.