मोदीखान्यात ११ लाखांची घरफोडी
By Admin | Updated: November 9, 2016 01:04 IST2016-11-09T01:07:10+5:302016-11-09T01:04:35+5:30
जालना : घरातील रोख ९ लाख ८० हजार आणि १ लाख ७४ हजार रूपयाचे सोन्याचे दागिने असा ११ लाख ५४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली.

मोदीखान्यात ११ लाखांची घरफोडी
जालना : दिवाळी निमित्त बाहेगावी गेल्याची संधी साधून शहरातील कॉलेज रोडवरील मोदीखाना येथील निलेश निर्मलचंद कासलीवाल यांच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील रोख ९ लाख ८० हजार आणि १ लाख ७४ हजार रूपयाचे सोन्याचे दागिने असा ११ लाख ५४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली.
मोदीखाना निलेश निर्मलचंद कासलीवाल (४४) त्यांची पत्नी आणि दोन मुले हे शनिवारी ५ नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त सिंधवाडा येथे नातेवाईकाकडे गेले होते. घरी त्यांचे वडील निर्मलचंद (७६) हे एकटेच घरी होते. ते इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर झोपले असताना चोरट्यांनी संधी साधत सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील रोख ९ लाख ८० हजार रूपये आणि १ लाख रूपयाचे १४५ गॅ्रम सोन्याचे दागिने चोरून नेले. यात १५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, ३० गॅ्रमच्या दोन सोन्याच्या बांगड्या, ५० गॅ्रमचे सोन्याचे ब्रासलेट, १० ग्रॅमचे कानातले, १५ गॅ्रमचा सोन्याचा हार, २० गॅ्रमच्या दोन सोन्याच्या बांगड्या, ५ ग्रॅम सोन्याचे मणी असा एकूण ११ लाख ७४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.
नीलेश कासलीवाले हे सिंधवाडा येथून मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता कुंटुंबियांसह घरी आले असता त्यांना घराचे कुलूप तोडण्यात आल्याचे दिसले. त्यांनी तातडीने घरात प्रवेश करून घरातील कपाटाची पाहणी केली. तेव्हा त्यांना घरातील दोन कपाटीची कुलूप तोडून त्यातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे समजले. त्यांनी साडेचार वाजता सदर बाजार पोलिस ठाण्याला याची माहिती दिली. सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील काकडे आणि सहकारी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. नीलेश कासलीवाल यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)