२६ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १०७ कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द
By Admin | Updated: August 7, 2014 01:30 IST2014-08-07T00:43:44+5:302014-08-07T01:30:16+5:30
नांदेड : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १०७ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश रद्द

२६ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १०७ कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द
नांदेड : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १०७ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश रद्द करताना या अधिकारी कर्मचाऱ्यांना तत्काळ मूळ जागेवर रूजू होण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बालाजी शिंदे यांनी दिले आहेत़ या आदेशामुळे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना हादरा बसला आहे़
राजकीय वरदहस्तातून जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेचे कर्मचारी एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत़ या कर्मचाऱ्यांना हलविण्याची तसदी अधिकारी घेण्यास धजावत नाहीत़ मात्र ही परंपरा मोडून काढीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शिंदे यांनी या पदावर रूजू होताच प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांनी मूळ ठिकाणी रूजू होण्याच्या सूचना दिल्या होत्या़ प्रारंभी या सूचनेला आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने घेतलेच नाही़ गेल्या दीड महिन्यात झालेल्या बैठकांतून याबाबत वारंवार सूचना दिल्या़ प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांची माहितीही मागविली़ ही माहिती प्राप्त होताच जिल्ह्यातील २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मूळ जागेवर रूजू होण्याचे आदेश दिले आहेत़ त्यात डॉ़ एल़ के़ कासराळीकर, डॉ़ पीक़े़ भुरे, डॉ़ डी़ एल़ कदम, डॉ़ फरनाज जहाँ, डॉ़ बी़ व्ही़ कदम, डॉ़ व्ही़ आऱ कदम, डॉ़ व्ही़ एम़ गायकवाड, डॉ़ आऱ एस़ कांबळे, डॉ़ एस़ एम़ कडीखाये, डॉ़ एस़ आऱ पवार, डॉ़ एऩ आऱ पवार, डॉ़ एस़ एम़ हाश्मी, डॉ़ व्ही़ एम़ भायेकर, डॉ़ आऱ जी़ बहिरवाड, डॉ़ एस़ जी़ पटवेकर, डॉ़ आऱ एऩ टोम्पे आदींचा समावेश आहे़ तर तब्बल १०७ आरोग्य कर्मचाऱ्यांचीही प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली़
या २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी तत्काळ हजर होवून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत़ जे अधिकारी-कर्मचारी आपल्या मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होणार नाही त्यांच्याविरूद्ध शिस्तभंगांची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे़ याबाबत आरोग्य सचिवांनाही कळविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़
मान्सून कालावधीतील परिस्थिती पाहता आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश बजावले आहेत़ अधिकारी- कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याच्या अनेक तक्रारी आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या आहेत़ याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली़ कर्मचारी मुख्यालयी आहेत की नाहीत, याबाबत खात्री करण्यासाठी ४ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे़ जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील ही पथके प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना अचानक भेटी देतील़ स्काईपी या अत्याधुनिक सॉफ्टवेअरचाही उपयोग केला जाणार असल्याचे डॉ़ शिंदे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती ही अपवादात्मक आणि आवश्यक स्थितीत करता येते़ ती प्रतिनियुक्तीही ठराविक कालावधीसाठी असते़ हे अधिकार विभागीय आयुक्त किंवा आरोग्य विभागाशी संबंधित असल्यास आरोग्य संचालनालयाकडून होते़