१२ रुग्णालयांत १०६ पदे रिक्त
By Admin | Updated: August 8, 2016 00:41 IST2016-08-08T00:33:12+5:302016-08-08T00:41:32+5:30
सितम सोनवणे , लातूर ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा आधारवड असलेल्या उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा फटका सामान्य रुग्णांना बसत आहे.

१२ रुग्णालयांत १०६ पदे रिक्त
सितम सोनवणे , लातूर
ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा आधारवड असलेल्या उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा फटका सामान्य रुग्णांना बसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदभरतीकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णांची मात्र गैरसोय वाढतच आहे. लातूर जिल्ह्यात १० ग्रामीण व २ उपजिल्हा रुग्णालये आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ६७३ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ५६७ पद भरती करण्यात आली आहे.
नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यात एक स्त्री रुग्णालय, १० ग्रामीण रुग्णालय, २ उपजिल्हा रुग्णालय यासोबत ट्रामा विभाग , फिरते रुग्णालय पथकातंर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. त्याअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ (वर्ग -१) अंतर्गत सामान्य राज्य सेवा गटातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची १८ पदे मंजूर करण्यात आली आहेत़ मात्र प्रत्यक्षात १४ पदे भरण्यात आली आहेत. लातूर शहरातील स्त्री रुग्णालयातील एक, ग्रामीण रुग्णालय मुरुड, जळकोट येथील प्रत्येकी १ तर अंधत्व नियंत्रण कार्यक्रम लातूर येथील १ असे एकूण चार वैद्यकीय अधीक्षकांची पदे रिक्त आहेत़ तसेच याच रुग्णालयातील वर्ग-२ अतर्गत असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८ पदे रिक्त आहेत. शासनाने ८१ जागांची मंजुरी दिलेली आहे. मात्र ७३ जागा भरण्यात आल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्राची आवड असलेल्या बहुतांश डॉक्टरांना कागदोपत्री मेळ घालण्याचे काम अधिक असल्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर शासकीय सेवेत रमत नाहीत. परिणामी, ग्रामीण रुग्णालयात अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडून फारसा उत्साह नाही.