१०४ सदस्यांवर जात वैधता प्रमाणपत्राची टांगती तलवार !
By Admin | Updated: October 18, 2016 00:09 IST2016-10-18T00:06:17+5:302016-10-18T00:09:36+5:30
लातूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांनी विहीत मुदतीत गटविकास अधिकाऱ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते.

१०४ सदस्यांवर जात वैधता प्रमाणपत्राची टांगती तलवार !
लातूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांनी विहीत मुदतीत गटविकास अधिकाऱ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. परंतु, अद्यापही हे प्रमाणपत्र सादर न केल्याने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या १०० सदस्यांवर जात वैधता प्रमाणपत्रांबाबत दुपारी ४ वाजता सुनावणी घेण्यात येणार आहे.
लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील ग्रामपंचायत सदस्यांनी विहीत मुदतीत आपले जात वैधता प्रमाणपत्र गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक होते. परंतु, कालावधी होऊनही जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया अनेक ग्रा.पं. सदस्यांनी केली नसल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सूचना करून जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सदस्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, शिरूर अनंतपाळ व जळकोट तालुक्यांतील २८ गावांतील १०४ सदस्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. तर उर्वरित ९ तालुक्यांतील ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्रांचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर न केल्याने त्यांनाही अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंबुलगा (स.), भिंगोली, चामरगा, कळमगाव, सांगवी (घु.), साकोळ, धामणगाव, थेरगाव, येरोळ, शेंद, कानेगाव, कांबळगा, उमरदरा, कारेवाडी, जोगाळा, डोंगरगाव बोरी, होनमाळ, तळेगाव (दे.), लक्कड जवळगा, बोळेगाव (बु.), शिवपूर, डिगोळ, सुमठाणा, हालकी, बिबराळ, हिप्पळगाव, तिपराळ अशा २७ गावांतील ९६ सदस्यांच्या व जळकोट तालुक्यातील अतनूर येथील पाच सदस्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत सुनावणी होणार असल्याने त्यांच्या सदस्यत्वावर टांगती तलवार राहणार आहे. (प्रतिनिधी)