१०४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 00:19 IST2017-02-08T00:15:05+5:302017-02-08T00:19:43+5:30
उमरगा : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गट व गणातून तब्बल १२३ जणांनी माघार घेतली़

१०४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात
उमरगा : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गट व गणातून तब्बल १२३ जणांनी माघार घेतली़ यात गटातून ६७ तर गणातून ५६ जणांनी अर्ज काढून घेतले़ आता जिल्हा परिषदेच्या ९ गटासाठी ३८ तर पंचायत समितीच्या १८ गणासाठी ६६ असे एकूण १०४ उमेदवार आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत़ यात गटामध्ये काँग्रेस, शिवसेना व भाजपाने सर्वच जागांवर तर राष्ट्रवादीचे सहा ठिकाणी उमेदवार आहेत़ गणाची परिस्थिती पाहता काँग्रेस व शिवसेनेने सर्वच १८ जागांवर उमेदवार दिले आहेत़ तर राष्ट्रवादीचे केवळ १० जागांवर उमेदवार आहेत़
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून तालुक्यातील राजकीय आखाडा चांगलाच पेटला होता़ उमेदवारी मिळविण्यासाठी प्रमुख पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठी फिल्डींग लावली होती़ उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षश्रेष्ठींनी काहींना उमेदवारी दिली़ उमेदवारी अर्ज न मिळाल्याने काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसानंतर जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी १०५ जणांनी अर्ज दाखल केले होते़ तर पंचायत समितीसाठी १२२ जणांनी अर्ज भरला होता़ त्यानंतर कोण अर्ज मागे घेणार आणि कोण बंडखोरी करीत निवडणूक आखाड्यात उतरणार यावर चर्चा रंगली होती़ मात्र, नेतेमंडळींनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केल्याने अखेरच्या क्षणी अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या अनेकांनी उमेदवारी मागे घेतली आहे़ त्यामुळे पक्षाकडून अर्ज भरलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे़ जिल्हा परिषदेच्या दाळींब गटात सर्वाधिक सहा तर पंचायत समितीच्या माडज गणात सर्वाधिक सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ काही गट-गणात तिरंगी तर कुठे चौरंगी लढत होत आहे़ काँग्रेसच्या नेतेमंडळींनी जिल्हा परिषदेतील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सर्वच जागांवर उमेदवार उभा केले आहेत़ मागील वेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसेना यावेळी पूर्ण ताकदिनिशी निवडणूक रिंगणात उतरली आहे़ तर मोजक्या जागांवर उमेदवार उभा करून त्यावरच लक्ष केंद्रीत करण्याची व्यूहरचना राष्ट्रवादीने आखल्याचे दिसत आहे़ अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वाधिक चर्चेत असलेले काँग्रेसचे दगडू मोरे यांनी कुन्हाळी गटातून तर बालक मदने यांनी कवठा गटातून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत़ शिवसेनेचे युवा नेते किरण गायकवाड यांनी तुरोरी गटातील अर्ज माघारी घेत कुन्हाळीतून निवडणूक लढविणे पसंत केले आहे़ तर गुंजोटी गटातील आरपीआयचे हरिष डावरे यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे़ सर्वच पक्षातील नारजांची मनधरणी करण्यात पक्षप्रमुखांना बरेचशे यश आले आहे़ त्यामुळे जिल्हा परिषद गटातून ६७ तर पंचायत समिती गणातून ५६ जणांनी माघार घेतली आहे़ असे असले तरी त्यांची निवडणूक प्रक्रियेतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे़ यंदा शिवसेना व काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी होती़ तिकीट न मिळाल्याने काही जणांची नाराजी कायम असून, याचा फटका उमेदवारांना बसू नये, यासाठीही नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे़ दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणामध्ये नऊ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत़ यात गटामध्ये पाच तर गणामध्ये चार उमेदवार उभे आहेत़ हे अपक्ष उमेदवार कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला जड जाणार आणि किती मते घेणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे़