१०२ कोटींचा निधी अखर्चित !

By Admin | Updated: December 22, 2016 23:49 IST2016-12-22T23:32:02+5:302016-12-22T23:49:07+5:30

लातूर : जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ अंतर्गत मंजूर निधीपैकी १०२ कोटीचा निधी रखडला आहे़

102 crores funded! | १०२ कोटींचा निधी अखर्चित !

१०२ कोटींचा निधी अखर्चित !

लातूर : जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ अंतर्गत मंजूर निधीपैकी १०२ कोटीचा निधी रखडला आहे़ याला शासनाकडून मंजुरी मिळूनही कृषि विभाग, बांधकाम विभाग, निर्मल भारत व जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या विविध विभागाकडून हा निधी खर्च केला जात नाही़ परिणामी १०२ कोटीचा निधी पडून आहे़ हा निधी मार्चअखेर खर्च नाही झाला तर पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेवून हा निधी इतर योजनेकडे वळविण्यात येणार असल्याने त्या-त्या विभागाने जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून होणाऱ्या विविध कामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे़
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वाधिक निधी कृषि विभागाचा रखडला आहे़ सुक्ष्म सिंचनापोटी १० कोटी ९८ लाख, तेलबिया उत्पादनासाठीचा १ कोटी ५६ लाख, एकात्मिक पाणलोट विकासापोटी आलेला तीन कोटी यासह इतर कामासाठी राहिलेला १७ कोटीचा निधी कृषि विभागाच्या उदासीनतेअभावी तसाच पडून आहे़ तसेच निर्मल भारत योजनेअंतर्गत शौचालय उभारणीसाठी ४६ कोटीचा निधी आला होता़ त्यापैकी ८ कोटी जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात आले आहेत़ तर ३८ कोटी ५० लाखाचा निधी मात्र पडून आहे़ बांधकाम विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या रस्त्याच्या ४० कामासाठी ३० कोटीचा निधी असून, यातूनही रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही़ तसेच जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीसाठी २ कोटी ५० लाख, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १ कोटी ५० लाख व इतर १ कोटी, असा एकूण २ कोटी ५० लाख, पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी १ कोटी ५० लाख, शाळा दुरूस्तीसाठी १ कोटी ५० लाख, ग्रामीण रस्त्यासाठी १२ कोटी २३ लाख तर पर्यटन व यात्रेसाठी ५ कोटीचा निधी उपलब्ध असूनही त्यातूनही कामे सुरू झालेली नाहीत़ असा एकूण १०२ कोटीचा निधी नियोजनाअभावी पडून आहे़ नियोजन विभागाकडून निधीची उपलब्धता करून दिली जात असली तरी संबंधित विभाग मात्र विविध विकास कामांवर हा निधी खर्च करण्यासाठी उदासीन असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे़

Web Title: 102 crores funded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.