पाचव्या फेरीनंतरही १००३ जागा रिक्त
By Admin | Updated: July 13, 2017 00:27 IST2017-07-13T00:24:36+5:302017-07-13T00:27:21+5:30
नांदेड: बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी जिल्ह्यातील १८७ शाळेत पाचव्या फेरी अखेर १ हजार ३ जागा अद्यापही रिक्तच आहेत़

पाचव्या फेरीनंतरही १००३ जागा रिक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी जिल्ह्यातील १८७ शाळेत १ हजार ५९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असले तरी पाचव्या फेरी अखेर १ हजार ३ जागा अद्यापही रिक्तच आहेत़
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अपंग विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी, मराठी शाळेत २५ टक्के या प्रमाणात इयत्ता पहिलीत मोफत प्रवेश देण्यात येत आहे़ यासाठी पहिली फेरी ७ मार्च रोजी पार पडली़ एकूण २ हजार ६०१ जागेसाठी १ हजार ९६९ विद्यार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली़ त्यापैकी १ हजार १४७ विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेत प्रवेश घेतला तर ३९४ विद्यार्थ्यांना विविध कारणांहून अपात्र ठरविण्यात आले़ तर ४२८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संपर्कच केला नाही़ दुसरी निवड यादी २७ मार्च रोजी जाहीर करण्यात आली़ एकूण १ हजार ४५४ जागांपैकी २३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला़ तर ३८ विद्यार्थी प्रवेशासाठी अपात्र ठरले़ तिसरी फेरी १९ एप्रिल रोजी पार पडली़ १ हजार २२२ जागांपैकी १३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले़ चौथी फेरी ८ मे रोजी जाहीर झाली़ यामध्ये १ हजार ८४ पैकी ९२ विद्यार्थ्यांची निवड केली़ तर ३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला़ आता पाचवी फेरी अखेर १ हजार ३ जागा रिक्त आहेत़ दरम्यान, आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी काही शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, तर काही शाळेत पालकांनीच पाल्यांना प्रवेश दिला नाही़
दरम्यान, रिक्त जागेसाठी व आरटीई २५ टक्के अॅडमिशनपासून वंचित असलेल्या शाळांनी रजिस्ट्रेशन करणे व आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यासाठी दुसरी प्रवेश फेरी सुरू करण्यात येत आहे़ ज्या शाळा प्रथम फेरीत रजिस्ट्रेशन केले नाहीत, अशा सर्व पात्र शाळा व प्रथम फेरीमधील ज्या शाळांना जागा वाढविण्यासाठी नोंदणी करायची आहे, अशा शाळांना १० त १४ जुलै या कालावधीत संधी देण्यात आली आहे़