1000 अंगणवाड्या होणार आयएसओ
By Admin | Updated: July 8, 2014 01:04 IST2014-07-08T00:37:32+5:302014-07-08T01:04:32+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी येत्या सहा महिन्यांत एक हजार अंगणवाड्या आयएसओ प्रमाणित करून घेण्याचा निर्णय विभागीय आयुक्त कार्यालयाने घेतला आहे.

1000 अंगणवाड्या होणार आयएसओ
औरंगाबाद : मराठवाड्यातील अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी येत्या सहा महिन्यांत एक हजार अंगणवाड्या आयएसओ प्रमाणित करून घेण्याचा निर्णय विभागीय आयुक्त कार्यालयाने घेतला आहे. त्यासाठी आठही जिल्हा परिषदांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत. गेल्या वर्षीही विभागातील ४७८ अंगणवाड्यांना आयएसओ प्रमाणपत्र घेण्यात आले असल्याचे उपायुक्त (विकास) सुरेश बेदमुथा यांनी सांगितले.
महिला व बालविकास खात्यातर्फे सहा वर्षांखालील मुलांसाठी अंगणवाड्या चालविल्या जातात. अंगणवाड्यांच्या इमारती बांधण्यासाठी शासनातर्फे वेळावेळी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे आता बहुसंख्य अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती मिळालेल्या आहेत. त्यानंतर आता या अंगणवाड्यांचा दर्जा उंचावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून गेल्या वर्षी काही अंगणवाड्यांना आयएसओ नामांकन मिळाले. त्यासाठी आयएसओच्या आवश्यक निकषांची पूर्तता करून घेण्यात आली. चालू वर्षीही आणखी एक हजार अंगणवाड्यांना आयएसओ करण्याचा निर्णय विभागीय आयुक्त कार्यालयाने घेतला आहे. विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशानुसार या विषयावर उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी जिल्हा परिषदांच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. बैठकीत सर्व जिल्हा परिषदांना आवश्यक कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विभागातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील सरासरी १२५ अंगणवाड्या यामध्ये घेतल्या जाणार आहेत.
लवकरच शुल्क भरणार
आयएसओ मानांकन मिळविण्याची विशिष्ट प्रक्रिया आहे. या अंतर्गत आयएसओ मानांकन देणाऱ्या संस्थेकडे आधी नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी सुमारे सहा ते सात हजार रुपये शुल्क असते. ते भरल्यानंतर संबंधित संस्थेचे अधिकारी येऊन तपासणी करतात. आयएसओ मानांकनाच्या निकषांची, आवश्यक सोयी-सुविधांची पूर्तता झाल्यानंतर आयएसओ मानांकन प्रदान केले जाते. त्यानुसार लवकरच हजार अंगणवाड्यांच्या आयएसओ मानांकनासाठी शुल्क भरणा केला जाणार आहे.