पार्कसाठी १०० एकर जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2016 01:27 IST2016-11-08T01:20:44+5:302016-11-08T01:27:13+5:30
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय त्वरित स्थलांतरित करा, असे आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मनपाला दिले होते

पार्कसाठी १०० एकर जागा
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय त्वरित स्थलांतरित करा, असे आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मनपाला दिले होते. मागील दहा वर्षांपासून मनपा फक्त जागेचा शोध घेत होती. आता जागेचा शोध थांबला असून, शासनाने मिटमिटा येथील १०० एकर जागा मनपाला मोफत देण्याचा निर्णय सोमवारी घेतला. यासंदर्भातील पत्रही मनपाला प्राप्त झाले आहे. लवकरच मनपाचे प्राणिसंग्रहालय मिटमिटा येथे हलविण्यात येईल.
सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांना खेळण्यासाठी जेवढी जागा हवी तेवढी जागा सध्या उपलब्ध नाही. प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द का करण्यात येऊ नये अशा आशयाची नोटीस केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मनपाला नोटीस बजावली होती. मान्यता रद्द होऊ नये म्हणून मनपाने तातडीने प्राणिसंग्रहालयाच्या जागेत वाढ करून नवीन प्रस्ताव प्राधिकरणाला सादर केला होता. या प्रस्तावाने प्राधिकरणाचे समाधान झाले होते. मात्र, मोठी जागा त्वरित शोधा ही अट कायम होती. पडेगाव, मिटमिटा भागात शासनाची जागा मिळावी म्हणून मागील अनेक वर्षांपासून मनपाचे प्रयत्न सुरू होते. जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्यामार्फत शासनाकडे जागा मिळावी म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शासनाने या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली. मिटमिटा येथील गट क्र. ३०४ मधील ६० हेक्टर जागा मनपाला देण्यात आली आहे. यासाठी शासनाने अटी व शर्तीही टाकल्या आहेत.