दौलताबाद हद्दीत १०० एकरची डील
By Admin | Updated: June 4, 2014 01:34 IST2014-06-04T01:16:30+5:302014-06-04T01:34:13+5:30
सुनील कच्छवे , औरंगाबाद शहर आणि परिसरात मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठी वाढ झाली आहे.

दौलताबाद हद्दीत १०० एकरची डील
सुनील कच्छवे , औरंगाबाद शहर आणि परिसरात मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. शहरातील नोंदणी व मुद्रांक शुल्क (रजिस्ट्री) कार्यालयात मोठ मोठे व्यवहार नोंदविले जात आहेत. या कार्यालयातील नोंदीनुसार मे महिन्यातील सर्वांत मोठा म्हणजे तब्बल १०० एकर जमिनीच्या खरेदीचा व्यवहार दौलताबाद हद्दीत झाला आहे. या जमिनीची खरेदी सात कोटी रुपयांमध्ये झाली आहे. ही सर्व जमीन बांधकाम व्यावसायिकाने खरेदी केली आहे. औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. शहरातील मोकळ्या जागा संपल्यामुळे आता शहराबाहेर चारही दिशांनी विस्तार होत आहे. अनेक बांधकाम व्यावसायिक शहरालगतच्या भागाकडे वळले आहेत. त्यामुळे शहरालगतही खरेदी विक्रीच्या व्यवहारांनी उच्चांक गाठला आहे. सातारा, देवळाई, हर्सूल सावंगी, शेंद्रा, करमाड, दौलताबाद या भागांतही घर आणि जमिनीचे व्यवहार होत आहेत. शहरातील नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयात मे महिन्यात दौलताबाद हद्दीतील गट क्रमांक ७, गट क्रमांक ८ आणि गट क्रमांक ९ मधील ४० हेक्टर ८० आर म्हणजे १०२ एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. एका बांधकाम व्यावयायिक फर्मने ही जमीन सात कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे.शासनाला या व्यवहारातून सुमारे ४९ लाख रुपयांचे नोंदणी व मुद्रांक शुल्क मिळाले आहे. नोंदणी व मुद्रांक खात्यातर्फे स्थानिक कार्यालयाला दरवर्षी उद्दिष्ट दिले जाते. गेल्यावर्षी या कार्यालयाला नोंदणी आणि मुद्रांक शुल्काचे २३७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले गेले होते. प्रत्यक्ष ३१ मार्चअखेरीस या कार्यालयाने २६० कोटींचा महसूल मिळविला. यंदा हे उद्दिष्ट आणखी वाढवून येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील खरेदी- विक्रीचे व्यवहार वाढल्याचे यातून स्पष्ट होत आहे. दररोज १५० व्यवहार औरंगाबाद शहरात नोंदणी व मुद्रांक विभागाची पाच दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. यातील तीन कार्यालये ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस तर दोन कार्यालये बीड बायपास येथे आहेत. या पाच कार्यालयांमध्ये रोज एकूण दीडशेहून अधिक व्यवहारांची नोंद होत आहे.