गोदावरी नदीपात्रातून १० वाहने, जेसीबी मशीन जप्त
By Admin | Updated: April 18, 2016 00:47 IST2016-04-18T00:45:14+5:302016-04-18T00:47:57+5:30
क्यातील धानोरामोत्या शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहन व साहित्यावर जिल्हाधिकारी महिवाल यांनी १७ एप्रिल रोजी पहाटे ५़३० वाजेच्या सुमारास धाड टाकली.

गोदावरी नदीपात्रातून १० वाहने, जेसीबी मशीन जप्त
पूर्णा : तालुक्यातील धानोरामोत्या शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहन व साहित्यावर जिल्हाधिकारी महिवाल यांनी १७ एप्रिल रोजी पहाटे ५़३० वाजेच्या सुमारास धाड टाकली. यामध्ये १० मोठी वाहने, जेसीबी मशीन व वाळू उपसा करणारे यंत्र महिवाल यांनी ताब्यात घेतले आहेत़
धानोरामोत्या शिवारात गोदावरी नदीपात्रात एका गटातील वाळू धक्का चालविण्यासाठी दिला असता, त्या वाळू धक्क्यातील वाळू उपसा न करता दुसऱ्याच गटातील वाळूचा उपसा होत असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्याकडे आली होती़ जेसीबीच्या सहाय्याने हा उपसा होत असल्याचे तक्रारीतून समजल्याने तक्रारीची दखल घेत रविवारी पहाटे ५़३० च्या सुमारास जिल्हाधिकारी महिवाल यांनी या भागाला भेट दिली़ या ठिकाणी पाहणी करून अवैधरित्या दुसऱ्या गटातील वाळू उपसा होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली़ जिल्हाधिकारी महिवाल घटनास्थळी अचानक दाखल झाल्याने वाळू उपसा करणारे कामगार व वाहनचालकांनी आपली वाहने जागेवर सोडून पळ काढला़ सकाळी ७ वाजता पूर्णेचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड, चुडावा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शेजवळ यांच्यासह मंडळ अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली़ घटनास्थळाचा पंचनामा करून पथकाने लहान, मोठी वाहने, जेसीबी मशीन व वाळू उपसा करणारे यंत्र ताब्यात घेतले आहेत़ या प्रकरणी रविवारी रात्री उशिरापर्यंत चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ दरम्यान, जिल्हाधिकारी महिवाल हे मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील वाळू माफियांवर रात्री-अपरात्री फिरून कारवाई करीत आहेत़ या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ (प्रतिनिधी)