१० ट्रक फटाके बाजारात
By Admin | Updated: October 27, 2016 00:53 IST2016-10-27T00:39:27+5:302016-10-27T00:53:41+5:30
औरंगाबाद : दिवाळीतील लक्ष्मीपूजन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. फटाक्यांची आतषबाजी करून दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा असल्याने बाजारपेठेत १० ट्रक फटाके आणण्यात आले आहेत

१० ट्रक फटाके बाजारात
औरंगाबाद : दिवाळीतील लक्ष्मीपूजन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. फटाक्यांची आतषबाजी करून दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा असल्याने बाजारपेठेत १० ट्रक फटाके आणण्यात आले आहेत. आकाशात फुटणारे रंगीबेरंगी थ्रीडी फटाके यंदाचे खास आकर्षण राहणार आहेत.
शिवकाशी, नगर, जळगाव येथून बाजारपेठेत फटाके आणण्यात आले आहेत. औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदान, टीव्ही सेंटर मैदान, फरशी मैदान, राजीव गांधी क्रीडांगण, शिवाजीनगर, पडेगाव आदी भागात ३५६ स्टॉलला अग्निशामक दलाने परवानगी दिली आहे. त्यात सर्वाधिक १८० स्टॉल जि.प. मैदानावर उभारण्यात आले आहे. त्यापैकी १४० स्टॉलवर फटाके उपलब्ध झाले आहेत. येथे ८ ट्रक फटाके आणण्यात आले, तर अन्य ठिकाणी फटाक्यांचे २ ट्रक दाखल झाले. एका ट्रकमध्ये ३५० बॉक्स असतात असे ३५०० बॉक्स फटाके विक्री करण्यात येणार आहे. फटाक्यांनी दुकाना सजल्या आहेत. शिवकाशीहून आलेल्या फटाक्यांमध्ये थ्रीडी फटाके आकर्षण ठरत आहे. थ्रीडी सिनेमा, थ्रीडी टीव्ही, थ्रीडी पुस्तक आता थ्रीडी तंत्रज्ञानावर आधारित फटाकेही काही नामांकित कंपन्यांनी बाजारात आणले आहे. यात अनार, रॉकेटचा समावेश आहे. हे फटाके फुटताना पाहण्यासाठी सोबत खास गॉगलही देण्यात येत आहे, अशी माहिती फटाक्यांचे वितरक दत्ता खामगावकर यांनी दिली. फटाक्यांचे व्यापारी युनूस हुसेन म्हणाले की, यंदा शिवकाशी येथील कंपन्यांनी तयार केलेले थ्रीडी भूईचक्र नावीन्यपूर्ण ठरत आहे. लहान मुलांसाठी यंदा कागदाचे स्टॉर्च गन विक्रीला आले आहे. या गनमधून रंगीत अग्नी बाहेर पडतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे याचा आवाज होत नाही. याशिवाय २५ शॉट ते हजार शॉटपर्यंतचे फटाके उपलब्ध झाले आहेत. हजार शॉटचे फटाके अर्धा ते एक तासापर्यंत सतत एकानंतर एक आकाशात उडतात, अशा फटाक्यांना मागणी अधिक आहे. याशिवाय आकाशात ६०० ते ६५० फूट उंच जाऊन सप्तरंगाची उधळण करणाऱ्या फटाक्यांनाही मागणी आहे. याशिवाय रंगीत बॉम्ब, रंगीत फटाके, काही फटाके असे आहेत की, ते फुटताना त्यातून संगीतासारखा धून निघतो. लहान मुलांच्या फटाक्यांमध्ये फॅन्सी फटाके मोठ्या प्रमाणात आले आहेत. पूर्वीच्या पारंपरिक फटाक्यांना आकर्षक रूप देण्यात आले आहे. सिरॅमिक अनारही विक्रीला आले आहेत.