जिल्ह्यात होणार १० लक्ष वृक्षलागवड
By Admin | Updated: June 30, 2017 23:27 IST2017-06-30T23:25:56+5:302017-06-30T23:27:27+5:30
हिंगोली : महाराष्ट्रात कृषी दिनानिमित्त ४ कोटी वृक्षलागवड केली जाणार असून, त्याच धर्तीवर एकट्या हिंगोली जिल्ह्यात ७ लाख ६६ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे.

जिल्ह्यात होणार १० लक्ष वृक्षलागवड
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्ट्रात कृषी दिनानिमित्त ४ कोटी वृक्षलागवड केली जाणार असून, त्याच धर्तीवर एकट्या हिंगोली जिल्ह्यात ७ लाख ६६ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. परंतु विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, शासकीय कार्यालये आदींनी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतल्यामुळे १० लाख ३० हजार वृक्षलागवड होणार असल्याची माहिती वन विभागाकडून मिळाली आहे.
वनविभागाच्या पाच तर समाजिक वनीकरण विभागाच्या ७ अशा एकूण १२ रोपवाटिका जिल्ह्यात आहेत. प्रत्येक रोपवाटिकेत रोपे उपलब्ध करुन दिली आहेत. यामध्ये वनविभागाच्या रोपवाटिकेत हिंगोली तालुक्यातील कोपरवाडी, जांभरुण, येडशी, सिंदगी, घोडा अडीच लाख रोपे, तर औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव, सिद्धेश्वर, माथा आणि जलालदाभा येथील रोपवाटिकेत ३ लाख रोपे, वसमत तालुक्यातील राजवाडी, डोणवाडा, वापटी, सिरळी येथे ३.५० लाख, सेनगाव तालुक्यातील खुडज, वडहिवरा, हनकदरी, तांदूळवाडी, येलदरी येथे ३ लाख, वारंगा येथे १.५० लाख तर सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकेत हिंगोली तालुक्यातील जोडताळा येथील आधुनिक रोपवाटिकेत १ लाख, वन उद्यान ५० हजार, सेनगाव येथील रोपवाटिकेत १ लाख, ब्राह्मणवाडा येथील रोपवाटिकेत ५० हजार, कळमनुरीतील मध्यवर्ती रोपवाटिकेत ३ लाख, वसमत तालुक्यातील खाजमापूर येथील रोपवाटिकेत २ लाख आणि औंढा नागनाथ तालुक्यातील मार्डी येथील रोपवाटिकेत ५० हजार अशी विविध जातीची रोपे उपलब्ध आहेत. मागील वर्षी एकूण ५ लाख ३५ हजार २६१ रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी ८५. २५ टक्के रोपे वाचली असल्याचा या विभागाचा आढाव्याअंती अहवाल आहे.
यंदाही वृक्ष लागवडीसाठी अनेक शाळा, महाविद्यालये, संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी पुढे आल्याने, वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याच विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी सांगितले.
यामध्ये वृक्ष प्रजातीनिहाय रोपवाटिकेत रोपे उपलब्ध आहेत. यामध्ये जीवनदायी वृक्षात वड, उंबर, पाखर, पिंपळ. देवालये किंवा मंदिराभोवती लावण्यास योग्य असलेल्या वृक्षामध्ये वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, शमी, आपटा, चिंच, चाफा, कडूनिंब यांचा समावेश आहे. उद्यानयात लावण्यास योग्य झाडे जलदगतीने वाढणाऱ्या झाडामध्ये बकाण, भेंडी, पांगरा, आकाशनिंब, महारुख, शाल्मली, कदंब आदी झाडांचा समावेश आहे. तर वनशेतीसाठी साग, बांबू, आवळा, अंजीर, चिंच, करवंद आदी अशी विविध प्रकारची झाडे उपलब्ध आहेत.