१ हजार ६३ गणेश मंडळे
By Admin | Updated: August 29, 2014 01:26 IST2014-08-29T00:35:24+5:302014-08-29T01:26:25+5:30
हिंगोली : जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव २९ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान साजरा होणार आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मिळून एकूण १ हजार ६३ गणेश मंडळांनी पोलीस विभागाकडे नोंदणी केलेली आहे.

१ हजार ६३ गणेश मंडळे
हिंगोली : जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव २९ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान साजरा होणार आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मिळून एकूण १ हजार ६३ गणेश मंडळांनी पोलीस विभागाकडे नोंदणी केलेली आहे. यातील ३१४ ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून या उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
हिंगोलीसह कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ तालुक्यातील शहरी भागांमध्ये यंदा २६५ तर ग्रामीण भागात ७९८ गणेश मंडळ स्थापन झाले आहेत. मागील वर्षी साधारणत: १ हजार गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची मुर्ती स्थापन केली होती. दरम्यान, सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी गणेश मंडळांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी जिल्हाभरात पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून संवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्त लावला आहे. याशिवाय इतरही अनेक उपाययोजना करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार (हिंगोली शहर), निलेश मोरे (हिंगोली ग्रामीण), पियुष जगताप (वसमत) पोनि, सपोनि, उपनिरीक्षक दर्जाचे ३५ अधिकारी व ८०० कर्मचारी या बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत.
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १२ ची एक कंपनी, नागपूरच्या प्रशिक्षण केंद्रातील २५ महिला पोलीस, लातूरच्या प्रशिक्षण केंद्राचे ५० पुरूष कर्मचारी, गृहरक्षक दलातील ३०० पुरूष व २५ महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी बोलावण्यात आले आहेत. या शिवाय मुंबईतील मरोळ येथील प्रशिक्षण केंद्रातील अप्पर पोलीस अधीक्षकही बंदोबस्तासाठी जिल्ह्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक एम.एम. कारेगावकर यांनी दिली. (प्रतिनिधी)