कागदावर १ लाख, हातात ३० हजार

By Admin | Updated: July 18, 2014 01:46 IST2014-07-18T00:21:21+5:302014-07-18T01:46:10+5:30

व्यंकटेश वैष्णव , बीड घरातील कर्ता-सवरता गेल्यावर मागे कुटुंबाचे काय होते हे ज्याच्यावर वेळ आली आहे त्यांना विचारा.

1 million on paper, 30 thousand in hand | कागदावर १ लाख, हातात ३० हजार

कागदावर १ लाख, हातात ३० हजार

व्यंकटेश वैष्णव , बीड
घरातील कर्ता-सवरता गेल्यावर मागे कुटुंबाचे काय होते हे ज्याच्यावर वेळ आली आहे त्यांना विचारा. आभाळच फाटल्यावर शिवायचं कुठं असा प्रश्न पाटोदा तालुक्यातील घुमरा पारगाव येथील आत्महत्या केलेल्या सुग्रीव शिंदे या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना पडला आहे. शासन म्हणायला एक लाखाची मदत देते, परंतु कुटुंबाच्या हातात केवळ तीस हजार रूपये येतात.
घुमरा पारगाव येथील सुग्रीव भागवत शिंदे (वय ४५) या शेतकऱ्यांने २ फेबु्रवारी २०१४ रोजी विष प्राशन करून आयुष्य संपवले. आता सुग्रीव यांची पत्नी वनमाला परिस्थितीशी झगडत आहे. घरी दहा एकर जमीन असताना देखील ती रोजंदारीने मजुरी करून आपल्या मुलांचे शिक्षण व घर चालवते आहे.
कर्जबाजारीपणामुळे पती व घराचा कर्ता करविता गेल्याचे दुख: हृदयात साठवून मोठ्या हिमतीने त्या लढत आहेत.
याबाबत सांगताना वनमाला शिंदे यांचे डोळे भरून येतात. वनमाला या मोठ्या धीराने परिस्थितीशी दोन हात करत आहेत. यावेळी त्या ‘लोकमत’शी बोलताना म्हणाल्या की, पतीच्या निधनानंतर मिळालेल्या सरकारी मदतीपेक्षा मी मुलांना हिमतीने आणि कष्टाने जगायचे शिकवतेय़ आज माझं कुटुंब अडचणीत असताना मुदत ठेवीच्या पैशाचा काय उपयोग असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
शासन मोठा गाजावाजा करीत १ लाखाची मदत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला दिली असल्याचे सांगते. मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या हातात केवळ ३० हजार रूपयाचा धनादेश टेकवते व उर्वरित ७० हजार रूपये त्या तालुक्यातील तहसीलदार व संबंधित शेतकऱ्याच्या पत्नीच्या संयुक्त खात्यावर फिक्स डिपॉझिट केले जातात़
शासनाने धनादेश स्वरूपात दिलेल्या ३० हजार रूपयांत साधी दहा एकर जमिनीची नांगरणी होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती वातानुकूलित रूममध्ये बसलेल्या नेत्यांना व अधिकाऱ्यांना का कळत नाही कोणास ठाऊक ?
दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
मागील पाच वर्षापासून सतत अल्प पाऊस पडत असल्याने जमिनीची नापिकी यामुळे संसाराचा गाडा हाकणे देखील आवघड झालेले असताना देखील त्यांच्यावर दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे. मुलगा श्रीरंग याने आयटीआय केलेला मात्र नोकरी नाही. तर दुसरा मुलगा आश्लेष दहावीत शिकत आहे.

Web Title: 1 million on paper, 30 thousand in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.