१८ लाखांत १ किलो सोने देतो म्हणून गंडविले !
By Admin | Updated: November 16, 2014 23:38 IST2014-11-16T23:30:15+5:302014-11-16T23:38:51+5:30
लातूर : ‘१८ लाख रुपयांत १ किलो सोने देतो’ म्हणून दोघांनी अहमदपुरातील एकाला फसविल्याची घटना उघडकीस आली आहे.

१८ लाखांत १ किलो सोने देतो म्हणून गंडविले !
लातूर : ‘१८ लाख रुपयांत १ किलो सोने देतो’ म्हणून दोघांनी अहमदपुरातील एकाला फसविल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, दोघांना लातूर ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून १२ लाख ११ हजार रुपयांसह एक कारही जप्त करण्यात आली आहे.
अहमदपूर येथील बाबूराव नरहरी कानगुले (वय ५१, रा़अहमदपूर) यांना दोन तरुणांनी ‘१८ लाखांमध्ये १ किलो सोने देतो’ म्हणून ८ नोव्हेंबर रोजी त्यांच्याकडून १६ लाख रुपये घेतले़ यापूर्वी २० दिवसाच्या फरकाने २ लाख रुपये घेतले होते. नंतर १६ लाख असे एकूण १८ लाख रुपये घेतले. परंतु, सोने न देताच फसवणूक करुन ते पळून गेले़ सोने न देता या पैशातून त्या दोघांनी जुनी कार खरेदी केली. गोव्याचा दौराही केला़ या प्रकरणी अहमदपूर येथील बाबुराव नरहरी कानगुले यांनी शनिवारी लातूर ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली़
या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना आरोपी लातुरात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवर सहाय्यक सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे एएसआय कोमवाड, संजय भोसले, राजेंद्र टेकाळे, बाळासाहेब मस्के, बळवंत गरड, शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे रामचंद्र ढगे यांनी पाळत ठेवून सापळा रचला. बाभळगाव नाका परिसरात एमएच २१ व्ही ८८८३ या कारसह या दोघांना पकडले. यावेळी त्यांच्याकडील १२ लाख ११ हजार रुपयेही जप्त केले. रविवारी रात्री उशिरा या दोघांनाही ताब्यात घेतले़
ताब्यात घेण्यात आलेला राहुल बाबुराव कांबळे हा चाकूर तालुक्यातील लातूररोड परिसरातील रहिवासी आहे. तर श्रीनिवास केरबा शिंदे हा चाकूर तालुक्यातील तेलगावचा आहे. या दोघांनाही अटक केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी सांगितले. पुढील तपास भातलवंडे करीत आहेत. दरम्यान, फसवणूक करणाऱ्या दोघा आरोपींना पीसीआर मिळाला असून, त्यांच्याकडून आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत, असेही पोलिस निरीक्षक भातलवंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
लातूर ग्रामीण तसेच स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून राहुल बाबुराव कांबळे व श्रीनिवास केरबा शिंदे या दोघांना अटक केली. रविवारी या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.