डिपॉझिट वाचविण्यास १ लाख १० हजार मतांची गरज
By Admin | Updated: May 13, 2014 01:01 IST2014-05-13T00:21:30+5:302014-05-13T01:01:27+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा निवडणुकीची मतमोजणी तीन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे निकालाविषयी आतापासूनच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

डिपॉझिट वाचविण्यास १ लाख १० हजार मतांची गरज
औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा निवडणुकीची मतमोजणी तीन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे निकालाविषयी आतापासूनच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कुणाचे डिपॉझिट वाचणार, कुणाचे जप्त होणार याविषयीही तर्क लढविले जात आहेत. प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचविण्यासाठी यावेळी १ लाख १० मते घ्यावी लागणार आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २४ एप्रिल रोजी मतदान झाले. मतदारांनी यावेळी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघात तब्बल ६२ टक्के मतदान झाले. एकूण ९ लाख ८२ हजार मतदारांनी मतदान केले. निवडणूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार उमेदवाराने वैध मतांच्या किमान १२.५ टक्के मते घेतले तरच त्याचे डिपॉझिट वाचू शकेल. लोकसभा निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच मतदान यंत्रावर उमेदवारांविषयी नापसंती दर्शविणारा (नोटा) पर्याय देण्यात आला. उमेदवाराच्या डिपॉझिटचा विचार करता नोटा पर्यायाला मिळालेली मते वगळली जातील. ही मते सोडून उर्वरित वैध मते गृहीत धरली जातील. त्या वैध मतांच्या तुलनेत १२.५ टक्क्यांपेक्षा जास्त मते घेतलेल्या उमेदवारांनाच त्यांचे डिपॉझिट परत मिळेल. मतदारसंघात झालेले एकूण मतदान लक्षात घेतल्यास डिपॉझिट वाचविण्यासाठी सुमारे १ लाख १० हजार मते मिळवणे आवश्यक ठरणार आहे. २७ उमेदवार रिंगणात लोकसभेचा अर्ज भरताना उमेदवारांना अनामत (डिपॉझिट) रक्कम भरावी लागते. यावेळी ही रक्कम खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५ हजार आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १२ हजार पाचशे रुपये एवढी होती. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण २७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे आता यापैकी किती जण १ लाख १० हजार मतांचा टप्पा ओलांडतात यावर त्यांचे डिपॉझिट वाचते की जप्त होते हे ठरेल. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पहिल्यांदाच शहराबाहेर होत आहे. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीला छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे. १६ मे रोजी होणार्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनानेही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्राबाहेर तब्बल पाचशे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.