कारमधून १ कोटी ४५ लाख पकडले
By Admin | Updated: November 9, 2016 00:55 IST2016-11-09T00:55:45+5:302016-11-09T00:55:26+5:30
परंडा : बीडहून परंडा मार्गे सांगलीला जाणाऱ्या इनोव्हा गाडीतून १ कोटी ४५ लाख रुपयाची रक्कम परंडा येथील स्थिर पथकाने मंगळवारी रात्री पकडली.

कारमधून १ कोटी ४५ लाख पकडले
परंडा : बीडहून परंडा मार्गे सांगलीला जाणाऱ्या इनोव्हा गाडीतून १ कोटी ४५ लाख रुपयाची रक्कम परंडा येथील स्थिर पथकाने मंगळवारी रात्री पकडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सध्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परंडा येथे निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी स्थिर पथके गठित करण्यात आले आहे. हे पथक परंडा-कुर्डूवाडी रोड, करमाळा रोड, बार्शी रोडवर तैनात करण्यात आलेली आहेत. सदरील पथकाच्या माध्यमातून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे .
परंडा-कुर्र्डूवाडी रोडवरील पथकाने बीड ते परंडा मार्गावरून सांगलीकडे जाणाऱ्या इनोव्हा कारची ( क्र .एम.एच ४५ के ९०९९) या तपासणी केली असता, गाडीत ४ बॅगमध्ये १ कोटी ४५ लाख रुपये आढळून आले. मोठी रक्कम असल्याने स्थिर पथक प्रमुख पी. एम. गलांडे यांनी निवडणूक निर्णय आधिकारी कांबळे यांना माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी भेट देऊन व्यापारी निलेश धोका यांना त्याच्या चालकासह गाडी व रोख रक्कम ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि रक्कम पोलिसांच्या ताब्यात दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. धुमाळ, पोनि दिनकर डबाळे, तहसीलदार स्वरूप कंकाळ, मुख्याधिकारी मिताली संचेती आदींची उपस्थिती होती.