जि.प. शाळांमधील ‘गणित’ चुकले
By Admin | Updated: September 13, 2014 23:45 IST2014-09-13T23:45:57+5:302014-09-13T23:45:57+5:30
सध्या कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे नगरपालिकांसोबतच जिल्हा परिषद शाळांवर अवकळा आली आहे. पटसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशातच शिक्षण विभागाने

जि.प. शाळांमधील ‘गणित’ चुकले
गरज ५५० शिक्षकांची; नियुक्त केवळ ४९ शिक्षक
रवी जवळे - चंद्रपूर
सध्या कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे नगरपालिकांसोबतच जिल्हा परिषद शाळांवर अवकळा आली आहे. पटसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशातच शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांना नवसंजिवनी देत शिक्षण प्रणालीत आमुलाग्र बदल केला. एक ते ५ पर्यंतचे वर्ग पूर्व प्राथमिक केले व सहा ते आठपर्यंतचे वर्ग प्राथमिक करीत जिल्हा परिषद शाळांना जोडले. आता या शाळांमध्ये गणित व विज्ञान विषयांसाठी ५५० शिक्षकांची गरज आहे. मात्र जिल्हा परिषदेने केवळ ४९ शिक्षकांचीच नियुक्ती केली आहे. उर्वरित शिक्षकच नसल्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील गणित व विज्ञान विषयांचा बोजवारा वाजला आहे.
अलिकडे इंग्रजीला चांगले दिवस आले आहे; नव्हे तर इंग्रजीशिवाय स्पर्धेच्या युगात टिकणे अवघड झाले आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे जाळेही सर्वत्र पसरले आहे. विद्यार्थ्यांचा व पालकांचाही कल इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांकडे वाढला आहे. त्यामुळे नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषद शाळांवर अवकळा पसरली आहे. या शाळांमधील पटसंख्या मागील पाच वर्षात झपाट्याने कमी झाली आहे. एवढी की या शाळांचे अस्तित्व टिकविणे स्थानिक स्वराज्य संस्थांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. अशातच शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांना नवसंजिवनी देत शिक्षण प्रणालीत यावर्षीपासून बदल घडवून आणला.
पूर्वी पहिला ते चवथ्या वर्गापर्यंतचे शिक्षण प्राथमिक व पाच ते सात वर्गापर्यंतचे शिक्षण मिडकस्कूल असायचे. त्यानंतर आठ ते दहाव्या वर्गापर्यंत माध्यमिक शिक्षण असायचे. आता पहिली ते चवथीला आणखी पाचवा वर्ग जोडून त्याला पूर्व प्राथमिक करण्यात आले. तर सहावी ते आठवीचे शिक्षण प्राथमिक केले. यामुळे आतापर्यंत खासगी शाळांमध्ये असलेला आठवा वर्ग जिल्हा परिषद शाळांना जोडण्यात आला. जिल्हा परिषद शाळांमध्ये नवा आठवा वर्ग आल्याने गणित व विज्ञान विषयांच्या शिक्षकांची गरज भासू लागली. जिल्ह्यात आठवा वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या २१० शाळा आहेत. या शाळांमध्ये सहा ते आठ वर्ग आहेत. पूर्वी जिल्हा परिषद शाळांमध्ये सातवीपर्यंत वर्ग असल्याने डीएड किंवा पदवीधर शिक्षकच विज्ञान विषय शिकवित होता. आता शासकीय नियमानुसार सहा ते आठ वर्गाला गणित व विज्ञान विषय शिकविण्यासाठी विज्ञान विषयाचाच शिक्षक हवा. जिल्हा परिषद शाळांना अशा ५५० शिक्षकांची गरज आहे. दरम्यान ही गरज पूर्ण करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ७३ शिक्षकांना नियुक्तीसाठी बोलाविले. यातील केवळ ४९ शिक्षकांचीच २८ जुलैला विज्ञान शिक्षक म्हणून नियुक्ती केली.