मुनगंटीवार मनपानंतर आता जिल्हा परिषदही राखणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 06:00 AM2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:22+5:30

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी होणार असून हैदराबाद पर्यटनाला गेलेले भाजपचे ३३ सदस्य सकाळी चंद्रपुरात दाखल होणार आहेत. दरम्यान, भाजप सदस्यांमध्ये काँग्रेसकडून फोडाफोडीच्या राजकारणाला संधीच मिळू नये, यासाठी सर्व सदस्य मतदानासाठी थेट सभागृहातच उपस्थितीत होतील, अशी रणनिती भाजपकडून तयार करण्यात आली आहे.

Zilla Parishad will now hold after Mungantiwar Municipal Corporation! | मुनगंटीवार मनपानंतर आता जिल्हा परिषदही राखणार!

मुनगंटीवार मनपानंतर आता जिल्हा परिषदही राखणार!

Next
ठळक मुद्देअध्यक्ष व उपाध्यक्षपदाची आज निवडणूक : वनिता आसुटकर, संध्या गुरूनुले, अर्चना जिवतोडेंच्या नावांची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहेत. मात्र चंद्रपूर जिल्ह्याचे भाजप नेते माजी अर्थ व नियोजन तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे जिल्हा परिषदेवर भाजपकडे मजबूत बहुमत आहे. नुकतेच महानगर पालिकेवर भाजपने वर्चस्व कायम राखले आता शनिवारी होत असलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेवरही बहुमताच्या आधारे भाजपचेच वर्चस्व कायम राहील असे चित्र आहे. केवळ निवडणुकीची औपचारिकता पार पाडली जाईल, अशी स्थिती आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी होणार असून हैदराबाद पर्यटनाला गेलेले भाजपचे ३३ सदस्य सकाळी चंद्रपुरात दाखल होणार आहेत. दरम्यान, भाजप सदस्यांमध्ये काँग्रेसकडून फोडाफोडीच्या राजकारणाला संधीच मिळू नये, यासाठी सर्व सदस्य मतदानासाठी थेट सभागृहातच उपस्थितीत होतील, अशी रणनिती भाजपकडून तयार करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरूनुले, वनिता आसुटकर, नितू चौधरी, विद्यमान कृषी सभापती अर्चना जिवतोडे यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता लक्षात घेता भाजप नेत्यांनी २८ डिसेंबर २०१९ रोजी सदस्यांना हैदराबाद येथे पर्यटनवारीला नेले होते. नेत्यांनी आदेश दिल्यामुळे सदस्य हैदराबाद येथे पोहोचले. मात्र, त्याठिकाणीही काही सदस्यांच्या एका गटाने नाराजीचा सूर कायम ठेवला. त्यामुळे शहरातील प्रेक्षणीय स्थळांचा आनंद लुटण्याऐवजी नाराज सदस्यांनी हॉटेलमध्येच बसून राहणे पसंत केल्याची माहिती काही सदस्यांनी चंद्रपुरात पोहोचली. त्यामुळे भाजप नेत्यांना या निवडणुकीत स्वपक्षातीलच सदस्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. अध्यक्षपदाचे नाव सर्व सदस्यांसमोर जाहीर करावे, असा हट्ट या नाराज सदस्यांनी धरला होता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून अजूनही अध्यक्षपदाचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

सुधीर मुनगंटीवारांमुळे मावळणार अंतर्गत नाराजी
जिल्हा परिषदेत भाजपचे ३३ व समर्थक अपक्ष ३ असे एकूण ३६ तर काँग्रेसचे २० सदस्य आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्षपदावरून भाजपच्या काही सदस्यांमध्ये नाराजीची चर्चा असली तरी राज्याचे माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे संघटन कौशल्य व विकासाभिमुख धोरणांमुळे सहमती घडून भाजप मिनी मंत्रालयालयाचा गड राखणार, यात शंकाच नसल्याची चर्चा सुरू आहे.

उपाध्यक्षपदासाठी दावे-प्रतिदावे
विद्यमान जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याकडे उपाध्यक्षपद सोपविले जाणार असल्याची चर्चा आहे. विद्यमान जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे हे चिमूर विधानसभा क्षेत्रातील असून, हे पद या विधानसभा क्षेत्राकडे जाण्याची शक्यता होती. मात्र, भोंगळे यांच्याकडे हे पद गेल्यास अध्यक्षपदासाठी चिमूर विधानसभा क्षेत्रातील महिला सदस्याच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. यासाठी सदस्यांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू आहेत. विद्यमान सभापती अर्चना जीवतोडे यासुद्धा आस लावून आहेत. मात्र, ऐनवेळी कोणते नाव समोर केले जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.

काँग्रेस पुन्हा विरोधी बाकांवर ?
जिल्हा परिषदेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. अध्यक्षपद महिला खुले प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर काँग्रेसच्या गटनेत्यांनी चाचपणी करून पाहिली होती. शिवाय, भाजपातील काही नाराज सदस्यांवर मदार ठेवून बैठकाही घेतल्या होत्या. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता आल्याने पक्षश्रेष्ठींकडून पाठबळ मिळेल, याचीही काँग्रेस सदस्यांना आस होती. मात्र बहुमतच नसल्याने अपेक्षा मावळल्या. काँग्रेसच्या सदस्यांचीही शुक्रवारी बैठक झाली. मात्र, विरोधी पक्ष म्हणूनच भूमिका बजावावी लागणार असल्याचे चित्र आहे.

Web Title: Zilla Parishad will now hold after Mungantiwar Municipal Corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.