पाणी प्रश्नावर जिल्हा परिषदेत वादळ

By Admin | Updated: May 26, 2017 00:13 IST2017-05-26T00:13:02+5:302017-05-26T00:13:02+5:30

सध्या तीव्र उन्हामुळे अनेक गावांत पाणी टंचाईची झळ निर्माण झाली आहे. मात्र जिल्हा परिषद प्रशासन याकडे लक्ष देत

Zilla Parishad storm on water issue | पाणी प्रश्नावर जिल्हा परिषदेत वादळ

पाणी प्रश्नावर जिल्हा परिषदेत वादळ

विरोधकांनी मडके फोडले : सत्ताधाऱ्यांकडून मोघम उत्तरे मिळत असल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या तीव्र उन्हामुळे अनेक गावांत पाणी टंचाईची झळ निर्माण झाली आहे. मात्र जिल्हा परिषद प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू आहे. बुधवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत विरोधकांनी पाणी प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना घेरले. मात्र सत्ताधाऱ्यांनी केवळ मोघम उत्तरे देऊन सभा चालविण्याचा प्रयत्न केला. यावर रोष व्यक्त करीत विरोधकांनी सभेचे प्रोसेडिंग फाडले, प्रवेशद्वारावर मडके फोडले. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आणि सभा केवळ १६ मिनिटात गुंडाळावी लागली.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अनेक योजना बंद पडल्या आहेत. तर ग्रामीण भागातील शेकडो हातपंपही बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी हाहाकार मचला आहे. मिळेल त्या पाणी स्त्रोताद्वारे गावकरी पाणी घेत आहेत. मात्र जिल्हा परिषद प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. पाणी प्रश्नावर सभा घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. तसे पत्र २५ एप्रिल रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांना देण्यात आले होते. मात्र तब्बल २९ दिवसांनी पाणी प्रश्नावर सभा घेण्यात आली.
सभेच्या प्रारंभीच जिल्ह्यातील किती हातपंप बंद आहेत, याबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा ९ हजार ७५० हातपंपापैकी ७ हजार ७८८ सुरू तर केवळ ९४ हातपंप बंद असल्याचे सांगण्यात आले. किती गावातील नागरिक फ्लोराईडयुक्त पाणी पितात व बंद हातपंपाची माहिती विरोधकांनी मागितली. मात्र सत्ताधाऱ्यांनी गावांची माहिती देण्यास नकार देत मोघम उत्तरे देत सभा चालविण्याचा प्रयत्न केला. अन्य प्रश्नावरही असाच प्रकार सुरू होता.
त्यामुळे विरोधक संतापून गेले व सभेचे प्रोसेडिंग फाडून प्रवेशद्वारावर सत्ताधाऱ्यांविरूद्ध घोषणा देत मडके फोडले. यावेळी काँग्रेसचे गटनेता डॉ. सतीश वारजूकर, खेमराज मरस्कोल्हे, गोपाल दडमल, डॉ. आसावरी देवतळे, काळे, पारखी, शेरकी, ममता डुकरे, नैना गेडाम, जीवतोडे, रमाकांत लोधे आदी उपस्थित होते.
पाणी प्रश्नावर सत्ताधारी किती तत्पर हे विशेष सभेवरून दिसून आले आहे. सत्ताधारी कमिशन असलेल्या कामाकडे लक्ष देत असून याविरूद्ध आंदोलन करण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे.

पाणी पुरवठा विभागात भ्रष्टाचार : सतीश वारजूकर
पाणी प्रश्नावर लक्ष देण्यासाठी जि. प. अध्यक्षांना पत्र देऊन सभा घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र अध्यक्षांनी याकडे दुर्लक्ष करून तब्बल २९ दिवसांनी सभा बोलाविली. विशेष सभेत विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर केवळ मोघम उत्तरे देण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले. हातपंप, पाणी पुरवठा योजना बंद असून नागरिकांची होरपळ सुरू आहे. सन २०१६-१७ मध्ये पाणी पुरवठा विभागाकडून योजनांच्या दुरूस्तीच्या कामावर ६५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र या कामांचा कोणताच फायदा गावकऱ्यांना झालेला नाही. पाणी पुरवठा विभागातील सदर भष्ट्राचार लपविण्यासाठीच अध्यक्षांनी पाणी प्रश्नावरील विशेष सभा केवळ १५ मिनिटात गुंडाळली, असा आरोप काँग्रेसचे गटनेता डॉ. सतीश वारजूकर यांनी केला आहे. अध्यक्षांच्याच गावात पाणी टंचाई असून सत्ताधारी सत्तेच्या अविर्भावात वागत असून त्यांना ग्रामीण विकासाशी काहीही देणे घेणे नसल्यानेच पाणी समस्या बिकट झाल्याचा आरोप डॉ. वारजूकर यांनी केला आहे.

विरोधकांना विकासाशी देणे-घेणे नसून त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. जिल्ह्यातील एकही गाव टंचाईग्रस्त राहू नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र यात विरोधकांना स्वारस्य नाही. पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर विरोधकांकडून राजकारण सुरू आहे. पाणी पुरवठा योजनांच्या कामावर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नसून विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत.
- देवराव भोंगळे
जि. प. अध्यक्ष, चंद्रपूर.

Web Title: Zilla Parishad storm on water issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.