जिल्हा परिषद पदाधिकारी, विरोधी सदस्यांत खडाजंगी
By Admin | Updated: January 23, 2016 01:03 IST2016-01-23T01:03:40+5:302016-01-23T01:03:40+5:30
थोर महात्मांच्या पुतळ्याची दुरवस्था झाली आहे. याकडे चंद्रपूर महानगर पालिका प्रशासन लक्ष देईल किंवा नाही,...

जिल्हा परिषद पदाधिकारी, विरोधी सदस्यांत खडाजंगी
चंद्रपूर : थोर महात्मांच्या पुतळ्याची दुरवस्था झाली आहे. याकडे चंद्रपूर महानगर पालिका प्रशासन लक्ष देईल किंवा नाही, मात्र जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन पुतळ्यांची देखभाल व दुरूस्ती करावी व इतर प्रश्नांवर विरोधी सदस्यांनी शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत मुद्दा लावून धरला. त्यामुळे विरोधी सदस्य व पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी १ वाजता स्थायी समितीची सभा सुरू झाली. यात विविध विषय चर्चेला ठेवण्यात आले. समाजकल्याण विभागामार्फत गतवर्षी शिलाई मशीन वाटप करण्यात आले. मात्र शिलाई मशीन वाटप करणाऱ्या वर्धमान इंडस्ट्रिजने अनेकांना मशीनचे पायदान व टॉप वाटप केले नाही. मात्र समाजकल्याण विभागाचे लिपीक कंकलवार यांनी सभागृहात खोटी माहिती दिली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सदस्यांनी गदारोळ घातला. त्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच अखर्चित निधी, घुग्घुसच्या नवीन सरपंचाला अधिकार देण्यास दिरंगाई, शालेय पोषण आहार, हातपंपाच्या दुरूस्तीसाठी साहित्याची खरेदी आदी विषयांवर विरोधी सदस्यांनी गदारोळ घातला. त्यामुळे हातपंप दुरूस्तीसाठी साहित्य खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले असून ८ दिवसांत साहित्य उपलब्ध होईल, असे सभाध्यक्षांनी सांगितले. या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले, बांधकाम सभापती देवराव भोंगळे, गटनेते सतिश वारजूकर, विनोद अहिरकर, संदिप करपे, पंकज पवार आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)