गोसीखुर्दच्या कालव्यात पडून युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: July 27, 2014 00:01 IST2014-07-27T00:01:26+5:302014-07-27T00:01:26+5:30
काल शुक्रवारी सायंकाळी आपली कामे आटोपून आपल्या राहत्या गावी जुगनाळा येथे जात असताना गोसीखुर्द कालव्याच्या पुलावरुन तोल जाऊन दुचाकीसह एक युवक खाली कोसळला.

गोसीखुर्दच्या कालव्यात पडून युवकाचा मृत्यू
पूल सदोष : उपाय करण्याची मागणी
ब्रह्मपुरी : काल शुक्रवारी सायंकाळी आपली कामे आटोपून आपल्या राहत्या गावी जुगनाळा येथे जात असताना गोसीखुर्द कालव्याच्या पुलावरुन तोल जाऊन दुचाकीसह एक युवक खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. नरेंद्र धोटे रा. जुगनाळा (३३) असे सदर युवकाचे नाव आहे. शेतकऱ्याच्या वरदानासाठी उभारलेला गोसीखुर्द कालवा अनेक लोकांचे बळी घेत असल्याने शाप ठरलेला आहे. हे पुन्हा या घटनेने सिद्ध केले आहे.
नरेंद्र धोटे हा युवक बेटाळा येथे ट्रॅक्टर चालक होता. संपूर्ण दिवसभर आपले कार्य आटोपून आपल्या मालकाच्या दुचाकीने सायंकाळी ७ वाजता तो जुगनाळाकडे निघाला. परंतु रस्त्यावर बांधलेला पूल हा रस्त्याला अनुसरुन नसल्याने व त्यावर कोणत्याही प्रकारचे कठडे उभारले नसल्याने तोल जाऊन नरेंद्र दुचाकीसह २० फुट खोलीच्या कालव्यात कोसळला.चौगाण- जुगनाळा रस्त्यावर कृषक विद्यालयाजवळ गोसीखुर्द विभागाने उजवा कालव्यावर पूल तयार केला. परंतु विभागाने जखम एकीकडे व मलम दुसरीकडे लावण्यासारखा प्रकार केला आहे. रस्त्याला अनुसरुन पुलाचे बांधकाम झाले नाही. रस्ता एकीकडे तर पूल दुसरीकडे, असे स्वरुप पहायला मिळते. या पुलाबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. परंतु तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. गोसीखुर्दच्या मुख्य अधिकाऱ्यांना मौका स्थळी आणून ही बाब निदर्शनास आणून दिली. परंतु कुठलीही कार्यवाही नाही.(प्रतिनिधी)