सोमनाथच्या श्रमसंस्कार शिबिरात युवकांचे हात सरसावले
By Admin | Updated: May 16, 2015 01:41 IST2015-05-16T01:41:57+5:302015-05-16T01:41:57+5:30
कुष्ठरोग्यांचे मसीहा थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून शुक्रवारी सोमनाथ प्रकल्पात श्रमसंस्कार शिबिराला प्रारंभ झाला.

सोमनाथच्या श्रमसंस्कार शिबिरात युवकांचे हात सरसावले
मूल : कुष्ठरोग्यांचे मसीहा थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून शुक्रवारी सोमनाथ प्रकल्पात श्रमसंस्कार शिबिराला प्रारंभ झाला. महारोगी सेवा समितीच्यावतीने आयोजित या श्रमसंस्कार शिबिराला छावणीचे स्वरूप आले असून या शिबिराचा शुभारंभ समाजसेवक डॉ.विकास आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सन १९६७ ला सोमनाथ येथे श्रमसंस्कार शिबिराची सुरुवात झाली. त्याची परंपरा कायम असून शिबिराचे हे ४८ वे वर्ष आहे.
या शिबिरात राज्यातील अनेक ठिकाणाहून युवकांचे जत्थे आले आले. आतापर्यंत ६५० युवक-युवतींची नोंद करण्यात आली. या श्रमसंस्कार शिबिराचा प्रारंभ श्रमदानाने झाला. २२ मेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात जलसंधारण, मृदसंधारण, शेतीची विविध कामे, त्यांच्या नवनवीन संकल्पना, व्यक्तीमत्त्व विकास व सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. नव्या पिढीला संस्कार मिळावे व त्या संस्कारातून देशातील भावी पिढी संस्कारमय निर्माण व्हावी, या उद्देशाने स्व.बाबा आमटे यांनी सुरुवात केलेल्या या श्रमसंस्कार शिबीराचा वसा डॉ.विकास आमटे यांनी हाती घेतल्याचे शिबीर प्रमुख रवींद्र नलगिरवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आजच्या युवकांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा निर्माण होऊन त्यांना श्रमाची महती कळावी. यातूनच नव्या प्रेरणा व वाटा मिळतील. यासाठी दरवर्षी होणारे हे शिबीर युवकांना प्रेरणादायी ठरते. याच बरोबर देशाविषयी आपुलकी निर्माण करण्याची ताकद या शिबिरातून त्यांना येते, असे या शिबिराचे संयोजक कौस्तुभ आमटे, शितल आमटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आठ दिवस चालणाऱ्या या श्रमसंस्कार शिबिराला युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार असून संस्काराची प्रेरणा नक्कीच मिळेल, असा आशावाद युवकांनी व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)