युवकांना लागली मुक्ताईची ओढ
By Admin | Updated: July 28, 2014 23:27 IST2014-07-28T23:27:37+5:302014-07-28T23:27:37+5:30
जीवनात प्रेमाला मर्यादा नाहीत. प्रेम हे आंधळं असतं, अन प्रेमासाठी वाटेल ते करण्याची जिद्द उराशी युवक बाळगतात. अशाच प्रेमाची भुरळ चिमूर तालुक्यातील मुक्ताईने युवकांना पाडली आहे.

युवकांना लागली मुक्ताईची ओढ
खडसंगी : जीवनात प्रेमाला मर्यादा नाहीत. प्रेम हे आंधळं असतं, अन प्रेमासाठी वाटेल ते करण्याची जिद्द उराशी युवक बाळगतात. अशाच प्रेमाची भुरळ चिमूर तालुक्यातील मुक्ताईने युवकांना पाडली आहे. मुक्ताईच्या प्रेमापोटी दूरवरुन युवक वाटेल ती किंमत मोजून मुक्ताईच्या कुशीत विसावत आहेत.
आषाढ महिन्यात पावसाच्या सरींनी वसुंधरेला न्हाहू घातल्यावर तिच्यावर हळुवार हाताने साज चढवून तिला अलंकारीत करण्याचे काम श्रावणवर सोपविले आहे. याच महिन्यात धरती पावसाच्या जलधारा उरात साठवून हिरवा गालिचा परिधान करते. मानवाच्या मनाला भुरळ पाडली जाऊन मानवाचे मन आनंदी करुन ते प्रेमाने न्हाहुन निघते.
मशागत करुन पेरणी करत तृप्त झालेली माती जसे नवे अंकुर घेऊन तरतरुन येते. तशीच काहीशी अवस्था मनाचीही या श्रावण महिन्यात झालेली असते आणि मग मन मानत नसल्याने मनुष्य निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद आनंद घेण्याच्या तयारीला लागतो.
पावसाळा सुरू झाला धबधब्यावर किंवा धरणावर जाण्याचा बेत प्रत्येकाचा असतो. ‘मुक्ता’ईच्या धबधब्यात वातावरण उत्साह वाढविणारे असल्याने निसर्गप्रेमींना सध्या मुक्ताई चांगलीच भुरळ पाडत आहे. चिमूर तालुक्यातील शंकरपूर- डोमापासून तीन किमी अंतरावर मुक्ताई हा धबधबा आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर अनेकांना आकर्षित करीत आहे. ३० ते ४० फूट उंचीवरुन पडणारे पाणी, त्यामुळे हवेत उडणारे पाण्याचे तुषार, हे पाहण्यासाठी पर्यटकांचे जत्थे मुक्ताईकडे येत आहे. दररोज शेकडो पर्यटक येथे भेट देत आहेत.
मुक्ताईच्या डोंगर कुशीत असलेला आजूबाजूचा परिसर मनाला प्रसन्न करुन टाकते. त्यामुळे मुक्ताईने परिसरातीलच नव्हे तर दूरवरच्या युवकांना भुरळ पाडली आहे. (वार्ताहर)