वाघाच्या हल्ल्यात युवक जागीच ठार, मूल तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 13:12 IST2021-12-31T12:37:24+5:302021-12-31T13:12:53+5:30
मूल तालुक्यात फुलझरी वरून डोणी येथे जात असलेल्या युवकाला रस्त्यालगत दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवून ठार केले. ही घटना ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मूल बफर क्षेत्रातील करवण येथील कक्ष क्रं. ३५१ मध्ये घडली.

वाघाच्या हल्ल्यात युवक जागीच ठार, मूल तालुक्यातील घटना
चंद्रपूर : वर्षाच्या अखेरीस आणखी एक वाघ हल्ल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी मूल बफर क्षेत्रातील करवण येथील कक्ष क्रं. ३५१ मध्ये वाघाने २३ वर्षीय युवकाला ठार केले. ही घटना शुक्रवारी (३१) सकाळी उघडकीस आली. भारत रामदास कोवे रा. डोणी असे मृत युवकाचे नाव आहे.
मूल तालुक्यातील व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील डोणी येथील भारत रामदास कोवे हा गुरुवारी सकाळी कामानिमीत्त बाहेरगावी गेला होता. काम पूर्ण करून फुलझरी मार्गे डोणी येथे सायं. ७ दरम्यान जात असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घेत जागीच ठार केले.
आज सकाळी माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृत्तदेह उपजिल्हा रुग्णालय मूल येथे पाठवले. यावेळी घटनास्थाळी वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी नायगमकर, जानाळाचे क्षेत्र सहा. विनोद धुर्वे, मूलचे पोलीस निरीक्षक सतिषसिंह राजपुत यासह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, यावर्षी वाघाच्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला तर अनेकजण जखमी झाले. मार्चमध्ये पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील शेतकऱ्याला वाघाने ठार केले होते. मागच्याच महिन्यात कसरगट्टा येथील कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेला कवीटबोळी शिवारात वाघाने ठार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच वेळवा येथे फिरायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना समोर आली होती.