बकरीच्या बलीदानाने वाचला तरुण गुराख्याचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:20 IST2021-07-15T04:20:28+5:302021-07-15T04:20:28+5:30
वाघ आणि गुराख्याच्या मधात बकरीची एन्ट्री सावरगाव : दैव जर बलवत्तर असले तर कुणीही कुणाचा प्राण घेऊ शकत नाही. ...

बकरीच्या बलीदानाने वाचला तरुण गुराख्याचा जीव
वाघ आणि गुराख्याच्या मधात बकरीची एन्ट्री
सावरगाव : दैव जर बलवत्तर असले तर कुणीही कुणाचा प्राण घेऊ शकत नाही. कितीही कठीण प्रसंग असला तरीही त्यावर तो जीव मात करतोच. म्हणून कदाचित ''देव तारी त्याला कोण मारी'' अशी म्हण समाजमनात रूढ झाली आहे. या बाबीचा प्रत्यय नुकताच वाढोणाजवळील खरकाडा या गावात आला.
येथील परिसरात पट्टेदार वाघाने मागील एक महिन्यापासून मनुष्यावर हल्ले करणे सुरू केले आहे. यात मनुष्य जीवहानी झाली आहे. खरकाडा येथील तरुण गुराखी गजानन सुरपाम व त्याचा मित्र सचिन सडमाके जंगलात जनावरे चारत असताना अचानक त्यांना वाघ दिसला. वाघ हा गोहणाशेजारी असल्याची त्या दोघांनाही जाणीव झाली; मात्र तो जनावरांवर हल्ला करीत नव्हता. तर तो गुराख्याच्या शिकारीची संधी शोधत होता. अशातच वाघ गजाननवर झडप घालणार तोच वाघ आणि गजाननच्या मधात बकरी धावत आली आणि वाघाने क्षणात गजाननला सोडून शेळीला पकडले. साक्षात मरण पुढे दिसत असताना तो बचावला; मात्र शेळीचा मृत्यू झाला. ही घटना खरकाडा गावाशेजारी घडली.