धक्के खाऊन खरेदी करावा लागतो भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:48+5:302021-03-07T04:24:48+5:30

चंद्रपूर : येथील मोठा भाजीपाला बाजार म्हणून ओळख असलेल्या गंजवार्डातील भाजी बाजारात महापालिकेने आखून दिलेले सीमांकन सोडून विक्रेते ...

You have to buy vegetables by pushing | धक्के खाऊन खरेदी करावा लागतो भाजीपाला

धक्के खाऊन खरेदी करावा लागतो भाजीपाला

चंद्रपूर : येथील मोठा भाजीपाला बाजार म्हणून ओळख असलेल्या गंजवार्डातील भाजी बाजारात महापालिकेने आखून दिलेले सीमांकन सोडून विक्रेते चक्क रस्त्यावर बसून भाजी विक्री करीत आहे. परिणामी ग्राहकांना धक्के खात भाजीपाला विकत घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच महापालिकेने प्रत्येक विक्रेत्यांसाठी सीमांकन आखून दिले आहे. मात्र सद्यस्थिती बिकट असून हम करे सौ कायदा अशी काहीशी अवस्था येथे बघायला मिळत आहे.

कोरोना संकटकाळात येथील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा बाजार कोहिन्यूर ग्राऊंडवर स्थलांतरित केला होता. त्यानंतर बाजारातील रस्ते, दुकान चाळी तसेच अतिक्रमण हटवून बाजार सुटसुटीत केला. त्यानंतर लाॅटरी पद्धतीने प्रत्येकाला गाळे तसेच बसण्यासाठी जागा आखून देण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पूर्ववत गंजवार्डमध्येच बाजार भरू लागला. मात्र सद्यस्थितीत बहुतांश विक्रेते सीमांकन सोडून रस्त्यावर दुकान थाटत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने हिच स्थिती असल्यामुळे येणाऱ्या ग्राहकांना नाहक इतरांचे धक्के खावे लागत आहे. एखाद्या विक्रेत्याला हटकले तर ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसून अख्खा बाजारच सीमांकन सोडून बसल्याचे खडेबोलही विक्रेते सुनावत असल्याचा प्रकार येथे बघायला मिळत आहे.

बाॅक्स

पालिका प्रशासन गप्प

येथील बाजारामध्ये महापालिका प्रशासनाने सीमांकन आखून दिले आहे. यानुसारच भाजीपाला विक्री करणे अत्यावश्यक आहे. मात्र व्यावसायिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. एक एक करीत पूर्ण बाजारात सद्यस्थितीत रस्त्यावर बसून भाजीपाला विक्री करीत असल्याचे चित्र आहे. मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.

बाॅक्स

ग्राहक संतप्त

येथून भाजीपाला खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे गर्दी नेहमीच होत आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला विक्रेते बसत असल्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्यांना नाहक त्रास होत आहे. अनेकवेळा ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये भांडणही होत आहे.

बाॅक्स वाहनतळ शेजारीच हातठेले

गंजवार्डातील बाजाराचे अतिक्रमण हटवून बाजार मोकळा करण्यात आला. तेव्हाच महापालिका प्रशासनाने वाहनतळावरही सिमेंटीकरण केले. मात्र येथे अस्थाव्यस्त वाहने लावले जात असून रामाळा तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात हातठेले चालक आपला व्यवसाय करतात. परिणामी ग्राहकांना आपले वाहन वाहनतळावर घेऊन जाणेही जिकरीचे होत आहे.

Web Title: You have to buy vegetables by pushing