ग्रामीण रुग्णालयातील ‘क्ष’ किरण यंत्र धूळ खात
By Admin | Updated: September 13, 2014 23:47 IST2014-09-13T23:47:54+5:302014-09-13T23:47:54+5:30
येथील ग्रामीण रुग्णालय मागील सात महिन्यांपूर्वी आलेले ‘क्ष’ किरण तपासणी यंत्र तज्ञ्जाअभावी धूळ खात पडले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.

ग्रामीण रुग्णालयातील ‘क्ष’ किरण यंत्र धूळ खात
सावली : येथील ग्रामीण रुग्णालय मागील सात महिन्यांपूर्वी आलेले ‘क्ष’ किरण तपासणी यंत्र तज्ञ्जाअभावी धूळ खात पडले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.
तालुक्यात एकमेव असलेल्या सावली येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ३० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव आहे. दोनच वैद्यकीय अधिकारी (पती- पत्नी) मागील सहा महिन्यांपासून या रुग्णालयाचा कारभार पाहात आहेत. रुग्णांना सेवा देताना त्यांची दमछाक होत आहे. चार वैद्यकीय अधिकारी येथे सहा महिन्यांपूर्वी कार्यरत होते. त्यांपैकी अधिक्षकांची बदली झाली, तर दुसऱ्या वैद्यकीय अधिकारी उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे गेले. त्यामुळे दोन्ही पदे रिक्त झाली आहेत. परिचारिकांची येथे कमतरता आहे.
सात परिचारिकांची आवश्यकता असताना येथे तीनच परिचारिका कार्यरत आहेत. त्यामुळे आंतररुग्ण विभागातील रुग्णांची हेडसांड होत असल्याची ओरड आहे. या कालावधीत साथीच्या आजारी रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शासनाकडून ग्रामीण रुग्णालयासाठी पुरविण्यात येणाऱ्या सर्व सुविधा या रुग्णालयात उपलब्ध असताना येथे कर्मचाऱ्यांची वानवा आहे. ‘क्ष’ किरण यंत्र मागील सात महिन्यांपासून धूळ खात पडून आहे. मात्र ‘क्ष’ किरण तंत्रज्ञाअभावी ते यंत्र आवश्यक त्या ठिकाणी लावण्यात आलेले नाही. शासनाने सुमारे एक कोटी रुपये किंमतीची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रुग्णालयात उपलब्ध करून दिली. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी ती रुग्णवाहिकाही धूळखात पडली आहे. अत्यावश्यक रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या सदर रुग्णवाहिकेचा केवळ वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी रुग्णांना कोणताही फायदा होताना दिसत नाही.
जनतेला सुविधा मिळत नसेल तर ती सेवा काय कामाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन शासनाने राज्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालय आणि तत्सम रुग्णालयात रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. परंतु बहुतेक ग्रामीण रुग्णालयात अशीच परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे वरिष्ठांनी आणि लोकप्रतिनिधींनी रुग्णालयातील कमतरतांची पूर्तता करुन देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)