महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे कामकाज प्रभावित
By Admin | Updated: August 4, 2014 23:38 IST2014-08-04T23:38:48+5:302014-08-04T23:38:48+5:30
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून विभागीय कर्मचारी संघटनेचे १ आॅगस्टपासून न्याय मागण्यासाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. परिणामी तहसील

महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे कामकाज प्रभावित
संप सुरुच : तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचा पाठिंबा
बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून विभागीय कर्मचारी संघटनेचे १ आॅगस्टपासून न्याय मागण्यासाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. परिणामी तहसील स्तरावरील कामकाज प्रभावित झाले असून नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या संपाला तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचा पाठिंबा दिला आहे.
महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला. २० मे २०१३ रोजी निवेदनातून भावना व्यक्त केली. त्यावेळी सरकारने केवळ आश्वासन देऊन बोळवन केली. महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी राज्य सरकारच्या विरोधात लढा ऊभा करण्यास कर्मचारी संघटनेला भाग पाडल्याची भावना संघटनेचे पदाधिकारी शैलेंद्र धात्रक व अजय मेकलवार यांनी व्यक्त केली. महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी संघटनेचे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जुलै महिन्यात कालबद्ध आंदोलन केले. यामध्ये काळ्याफिती लावून काम करणे, जिल्हाधिकाऱ्यांना ९ जुलै रोजी निवेदन दिले. १४ जुलैला एक दिवसासाठी लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. मात्र महसूल मंत्रालयाकडून काहीच तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. यामुळे महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी संतापले. अखेर १ आॅगस्टपासून बेमुदत संपावर गेल्याने महसूल प्रशासनातील कामकाजच ठप्प झाले आहे. याचा त्रास सामान्य जनतेला भोगावा लागत आहे. महसूल कर्मचारी संघटनेने नायब तहसीलदारांना राजपत्रीत अधिकाऱ्यांचा दर्जा देऊन ग्रेड पे वेतनात दुजाभाव केला आहे. यात वाढ करावी. लिपीकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक पदनाम करावे, महसूलविभागातील नायब तहसीलदार संवर्गातील पदे पदोन्नतीने भरण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.(शहर प्रतिनिधी)