कामावरुन काढल्याने कामगाराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2016 00:49 IST2016-02-25T00:49:15+5:302016-02-25T00:49:15+5:30
वणी तालुक्यातील मुंधोली येथील ओबी उत्खनन करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये कामावर असणाऱ्या कामगाराला येथील व्यवस्थापनाने कामावरुन कमी केले.

कामावरुन काढल्याने कामगाराची आत्महत्या
नुकसान भरपाई द्या : करमजित सिंग कंपनी लिमि. मुंधोली येथील कामगार
भद्रावती: वणी तालुक्यातील मुंधोली येथील ओबी उत्खनन करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये कामावर असणाऱ्या कामगाराला येथील व्यवस्थापनाने कामावरुन कमी केले. यामुळे त्रस्त झालेल्या कामागराने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्रीदरम्यान घडली.
हनुमान मधुकर खामनकर (२७) रा. कुन्हाडा भद्रावती असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो गेल्या १० महिन्यापासून वणी क्षेत्रातील मुंघोली येथील करमजीत सिंग कंपनी लिमि. या वेकोलि येथील ओबी उचल करणाऱ्या कंपनीमध्ये वॉल्वो ड्रायव्हर या पदावर कार्यरत होता. २७ जानेवारीला हनुमान हा कामावर गेला असता त्याच्या हातून एक छोटा अपघात घडून वाल्वो पलटी झाला. त्यामुळे येथील प्रबंधक सलोदर सिंग यांनी हनुमानला एक आठवड्यासाठी विश्रांती घेण्यासाठी रजा दिली. रजा संपल्यानंतर हनुमान हा पुन्हा कामावर गेला असता प्रबंधकाने कंपनीचा वाल्वो पलटी झाल्याने कंपनीचे नुकसान झाले आहे, ते तू भरुन दे तेव्हाच तुला कामावर घेतो, असे म्हणून त्याला कामावर घेण्यात आले नाही. हा सर्व प्रकार येथील कामगार नथ्यू नवले, संदीप कंडे, गजानन पेटकर, पवन वराटकर, शंकर मडावी, ललित वर्मा, प्रकाश पानघाटे, संदीप आसूटकर या सर्व कामगार समोरच झाल्याने या घटनेची सर्व माहिती या कामगारांना होती. या कामगारांनी हनुमानने कामावरुन कमी केल्यानेच आत्महत्या केल्याचे ‘लोकमत’जवळ सांगितले. मृत हनुमान हा घरातील एकमेव कामावता होता. त्याच्या मागे म्हातारी आई व लहान भाऊ आहे. (शहर प्रतिनिधी)
कंपनीचा स्थानिकावर अन्याय
करमजीत सिंग कंपनीमध्ये कामावर असणाऱ्या स्थानिक कामगारांनी सांगितले की येथे कामावर स्थानिक व प्ररप्रांतीय दोन्ही कामगार असून कंपनीच्या वतीने एक बंफर प्राईज देण्यात आले आहे. आठ तासात वाल्वो गाडीने ३० ट्रीपा मारल्यास चालकाला अतिरिक्त १०० रुपये देण्याचे प्रलोभन कंपनीने दाखविले आहे. त्या १०० रुपयाच्या नादात चालकाकडून काही अपघात झाल्यास त्याला कामावरुन कमी करण्यात येते. परंतु परप्रांतीयांसाठी हा नियम नाही. दरम्यान, कोणत्याही कंपनीला कामगारांना एकदम कामावरुन कमी करण्याचा अधिकारी नाही. हनुमान याला आत्महत्या करण्यास कंपनीने बाध्य केले आहे. त्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी, यासाठी कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी मजदूर संघाचे राजू यादव यांनी दिला आहे.