बचतगटांना प्रोत्साहन देण्याचे काम प्रशंसनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:41 IST2021-02-05T07:41:30+5:302021-02-05T07:41:30+5:30
जयंत पाटील : रमेश राजूरकर यांच्या कार्याची घेतली दखल चंद्रपूर : बचतगटाच्या माध्यमातून प्रगती साधने शक्य आहे. मात्र त्यासाठी ...

बचतगटांना प्रोत्साहन देण्याचे काम प्रशंसनीय
जयंत पाटील : रमेश राजूरकर यांच्या कार्याची घेतली दखल
चंद्रपूर : बचतगटाच्या माध्यमातून प्रगती साधने शक्य आहे. मात्र त्यासाठी या गटांना प्रोत्साहन तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेचे संस्थापक रमेश राजूरकर यांनी सुरू केलेले काम प्रशंसनीय आहे. यातून जिल्ह्यातील महिला बचतगटांची प्रगती होईल, असा आशावाद राज्याचे जलसंपदामंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी वरोरा येथे जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेचे संस्थापक तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर यांची भेट घेत बचतगटासाठी केलेल्या कामाची माहिती जाणून घेतली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे, माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, भद्रावती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुजाज शेख, वरोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विशाल पारखी आदींसह आदित्य राजूरकर, मुकूल राजूकर, माया राजूरकर यांच्यासह जय गुरुदेव संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रमेश राजूरकर यांनी बचतगटांनी तयार केलेल्या साहित्यासंदर्भात मंत्री जयंत पाटील यांना माहिती दिली. दरम्यान, महिला सक्षमीकरण तसेच सुशिक्षित बेरोजगारांकरिता रोजगार, स्वयंरोजगारासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. या कामासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.