चेक बोरगावात अवैध दारू विक्रीविरोधात महिलांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST2021-03-17T04:28:19+5:302021-03-17T04:28:19+5:30

फोटो गोंडपिपरी : गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील चेक बोरगाव येथे अवैध दारू विक्रेत्यांनी हैदोस घातला असून, आबालवृद्ध व्यसनाच्या आहारी ...

Women's Elgar against illegal liquor sales in Czech Borgaon | चेक बोरगावात अवैध दारू विक्रीविरोधात महिलांचा एल्गार

चेक बोरगावात अवैध दारू विक्रीविरोधात महिलांचा एल्गार

फोटो

गोंडपिपरी : गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील चेक बोरगाव येथे अवैध दारू विक्रेत्यांनी हैदोस घातला असून, आबालवृद्ध व्यसनाच्या आहारी गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गावातील महिलांनी संघटित होऊन अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात एल्गार पुकारून दारूविक्री बंद करण्यासाठी कंबर कसली आहे.

अशातच सोमवारी महिलांनी देशी दारूची एक पेटी पकडून होळी केली, तर मंगळवारी सकाळी दारू विक्री करताना एकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती आहे.

तत्पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊन अनेक वर्षे लोटली. यादरम्यान तत्कालीन ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांच्या कारकिर्दीत गोंडपिपरी तालुक्यात दारूबंदीची सोनेरी पहाट उगवली होती. मात्र, ठाणेदार बदलताच अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी डोके वर काढत संपूर्ण तालुक्याला गवसणी घालत दारू विक्रीचे जाळे विणले. अशातच मुल येथील एका मद्य सम्राटाने गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यात दारू तस्करी करण्याचा यशस्वी प्रयत्न चालविला असून, महिन्याकाठी तालुक्यात दोन हजार देशी दारू पेट्या पुरवठा करण्याचा विडा उचलल्याची विश्वसनीय माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यामुळे बनावट व हानिकारक अशा दारूच्या सेवनाने अनेकांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत असताना तसेच आबालवृद्ध व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे व कौटुंबिक वाद निर्माण होत असल्याच्या कारणांमुळे त्रस्त झालेल्या चेक बोरगाव येथील महिलांनी संघटित होऊन गावातील सर्व दारू विक्रेत्यांना दारूविक्री बंद करण्यासंदर्भात सूचना दिल्या. दरम्यान, सोमवारी रात्रीच्या सुमारास बेवारस सापडलेली एक पेटी देशी दारू पकडून त्याची होळी केली. तर मंगळवारी सकाळच्या सुमारास गावात पुन्हा दारू सापडल्याने ती पकडून थेट पोलिसांना पाचारण करण्यात आले.

कोट

चेक बोरगाव येथील पोलीसपाटील मुख्यालयी राहात नसून, यामुळे गावातील अवैध धंद्याबाबत माहिती देण्यास असमर्थ ठरत आहेत. यामुळे दिवसागणिक अवैध व्यवसायात वाढ होत असून, याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

- रामदास शेंडे, माजी सरपंच, चेक बोरगाव

Web Title: Women's Elgar against illegal liquor sales in Czech Borgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.