शिक्षणामुळेच महिला उच्चपदावर कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:40 IST2018-11-02T22:40:33+5:302018-11-02T22:40:53+5:30

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देताना महिलांनी चूल आणि मूल यामध्येच गुरफटून न राहता पुढे यावे, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच स्व. इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होऊ शकल्या. तर अनेक महिला विविध क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत, असे प्रतिपादन आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

Women are working on higher levels because of education | शिक्षणामुळेच महिला उच्चपदावर कार्यरत

शिक्षणामुळेच महिला उच्चपदावर कार्यरत

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : नवरगाव येथे काँग्रेसचा महिला मेळावा, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नवरगाव : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देताना महिलांनी चूल आणि मूल यामध्येच गुरफटून न राहता पुढे यावे, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच स्व. इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होऊ शकल्या. तर अनेक महिला विविध क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत, असे प्रतिपादन आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
नवरगाव येथे स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महिला मेळावा व जेष्ठ महिलांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. नितीन कोडवते, जि. प. सदस्य तथा तालुका काँ. कमिटीचे अध्यक्ष रमाकांत लोधे, अ‍ॅड. कविता मोहरकर, प्रबोधनकार तुलसी हिवरे नागपूर, माजी नगराध्यक्ष तथा जि. प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम गडचिरोली, तालुकाध्यक्ष कविता कुंटावार, अरुण कोलते, विनोद लोणकर, दादा चनबनवार, संजय कामडी, शशीकांत जैस्वाल, चंद्रकला बोडणे, विद्या बावणकर, आनंद टिपले, चंद्रभूषण जयस्वाल, ए.शा. निवावे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी परिसरातील जेष्ठ ४० महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार वडेट्टीवार म्हणाले, भारताच्या माजी पतप्रधान इंदिरा गांधी यांनी विविध क्षेत्रात काम करुन प्रगती केली. एक महिला देशाची यशस्वी पंतप्रधान बनू शकते यांचा आदर्श महिलांना घ्यावा, असे ते म्हणाले.
नवरगाव आणि परिसरात गोसीखुर्दचे पाणी अद्यापही पोहचले नाही. मात्र २०१९-२० मध्ये गोसीखुर्द धरणाचे पाणी या परिसरात येणारच असा विश्वास व्यक्त केला. या परिसरातील कालव्याच्या सर्व कामाचे टेंडर करण्यास आपण सरकारला भाग पाडले असून पुढील वर्षात पाणी पोहचणार असल्याने आश्वासन आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष दीपक चहांदे, संचालन मंदा चौके तर उपस्थितांचे आभार सरपंच अनिता गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाला आनंद मेश्राम, बुधाजी इंदुलवार, संजय सोनकुसरे, उपसरपंच मधुकर गहाणे व वामन बोडणे, नवरगाव काँग्रेस कमेटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Women are working on higher levels because of education