मुख्यालयी न राहता घरभाड्याची उचल
By Admin | Updated: September 10, 2014 23:33 IST2014-09-10T23:33:51+5:302014-09-10T23:33:51+5:30
ग्रामीण भागात शासनाकडून विविध सुविधा दिल्या जातात. यासाठी गावपातळीवर कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी राहून जनतेची सेवा करावी ही अपेक्षा आहे.

मुख्यालयी न राहता घरभाड्याची उचल
देवाडा खुर्द : ग्रामीण भागात शासनाकडून विविध सुविधा दिल्या जातात. यासाठी गावपातळीवर कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी राहून जनतेची सेवा करावी ही अपेक्षा आहे. यासाठी प्रत्येकाने मुख्यालयी राहण्याचा नियम राज्य शासनाकडून करण्यात आला आहे. मात्र पोंभुर्णा तालुक्यातील कर्मचारी या नियमांची सर्रास पायमल्ली करीत आहे.
तालुकास्तरावर व ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी या सर्वानी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. याकरिता कर्मचाऱ्यांना १५ टक्के प्रोत्साहन भत्ता दिला जातो. एकस्तर पदोन्नतीही दिली जाते. याचा लाभ घेणारे ८० टक्के कर्मचारी आहे. प्रत्यक्षात मात्र या पैकी दहा टक्केच कर्मचारी मुख्यालयी राहात असल्याचे वास्तव आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांनी शहरातच आपला ठिय्या मांडला आहे. तालुक्यातील काही शाळांतील शिक्षक मुख्यालयी राहत नाही. मात्र भत्त्याची ते नियमित उचल करीत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचाही कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे आता बोलल्या जात आहे. कर्मचारी शहरातून ये-जा करुनच कामकाज करतात. बरेच कर्मचारी पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेत बैठक असल्याचे सांगून आठवड्यातून दोन ते तीन दिवस मुख्यालयी फिरकतच नाही. यामुळे ग्रामीण भागातील शासकीय कामकाज पूर्णत: ठेपाळले आहे. याला सुरळीत करण्यासाठी मुख्यालयी राहण्याचा अटीची पालन करणे आवश्यक आहे.
वरिष्ठांकडून कठोर कारवाई केल्याशिवाय हे कर्मचारी मुख्यालयी राहणार नाही. यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.(वार्ताहर)