मेघगर्जनेसह वादळी पाऊस
By Admin | Updated: May 16, 2015 01:34 IST2015-05-16T01:34:56+5:302015-05-16T01:34:56+5:30
शुक्रवारी दुपारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला.

मेघगर्जनेसह वादळी पाऊस
चंद्रपूर : शुक्रवारी दुपारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथे तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर व पेंढरीपासून जवळच असलेल्या वळसी येथे तीन जनावरांवर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले. ब्रह्मपुरी व गडचांदूर येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाली तर अनेक गावातील वीज पुरवठा खंडीत झाला.
शुक्रवारी दुपारी चंद्रपूर, ब्रह्मपुरी, कोरपना, घुग्घुस, गडचांदूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. ब्रह्मपुरी तालुक्याला मेघगर्जनेसह तब्बल दीड ते २ तास मुसळधार पाावसाने झोडपून काढले. या वादळात ब्रह्मपुरी-वडसा रोडवरील आमले राईस मिलजवळ मोठा झाड कोसळल्याने राज्यमार्गावरील वाहतूक खोळंबली होती. विद्युत तारा तुटल्याने शहराचा वीज पुरवठा बंद पडला. शुक्रवार हा येथील बाजाराचा दिवस होता. ग्रामीण भागातून बाजारासाठी येणाऱ्या लोकांना पावसाचा मोठा फटका बसला. कोरपना तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे लग्न कार्य असणाऱ्यांच्या घरचे मंडप उडाले. वादळामुळे तालुक्यातील वीज पुरवठा नऊ तास बंद होता. कोरपना-गडचांदूर मार्गावर झाड कोसळल्याने हा मार्ग एक तास बंद पडला होता. (लोकमत चमू)