लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेवरून काँग्रेसमध्ये पेटलेल्या गटबाजीवर मंगळवारी (दि.३ फेब्रुवारी) रात्री उशिरापर्यंत दिल्ली दरबारी खलबते सुरू होती. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अडीच वर्षांसाठी महापौरपद खासदार प्रतिभा धानोरकर गटाकडे, उपमहापौरपद आमदार विजय वडेट्टीवार गटाकडे देण्यावर चर्चा झाली. तसेच सत्तास्थापनेसाठी मित्र पक्ष म्हणून उद्धवसेनेला सोबत घेऊन त्यांना स्थायी समितीचे सभापतिपद देण्याचाही विचार करण्यात आला. मात्र गटनेतेपदावर दोन्ही नेत्यांचा दावा केल्याने रात्री उशिरापर्यंत बैठक सुरूच होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महानगरपालिकेच्या निकालानंतर काँग्रेसमधील दोन गटांमध्ये सत्तेच्या गणितावरून तीव्र संघर्ष उफाळून आला होता. काँग्रेसकडे एकूण २७ नगरसेवक असून त्यापैकी वडेट्टीवार गट १७, तर धानोरकर गटाकडे १३ नगरसेवक असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर यांना दिल्ली येथे बोलाविले. या बैठकीला खासदार श्यामकुमार बर्वे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत, माजी शहरजिल्हाध्यक्ष रामू तिवारी, विधानसभा उमेदवार प्रवीण पडवेकर उपस्थित असल्याची माहिती आहे.
वेणूगोपाल यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत महापौर पदाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आधी ठरविल्यानुसार पदाचे वाटप होईल. यामुळे चंद्रपूरचे महापौरपद धानोरकर यांच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे. महापौरपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना दिल्लीतील या निर्णयामुळे काँग्रेसमधील अनिश्चितता दूर झाली आहे. मात्र प्रत्यक्ष सत्तास्थापनेदरम्यान सर्व नगरसेवक एकत्र राहतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उद्धवसेना सुरुवातीपासून महापौर पदावर अडून आहे.
काँग्रेसकडून उद्धवसेनेला स्थायी समिती सभापती पद देण्याचा विचार करीत असल्याची काँग्रेस गोटातील माहिती आहे. आता उद्धवसेना काँग्रेसने दिलेल्या स्थायी समिती सभापतीपदावर समाधानी होणार काय, हे बघण्यासारखे आहे.
स्थायी समिती सभापतीपदाचा प्रश्नच येत नाही - संदीप गिन्हे
अजूनपर्यंत आमच्याकडे काँग्रेसचा प्रस्ताव आलेला नाही. आम्ही महापौर पदावर ठाम आहोत. काँग्रेसकडून स्थायी समिती सभापती पदाचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया उद्धवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिन्हे यांनी 'लोकमत'ला दिली.
वडेट्टीवारांचा विभागीय आयुक्तांवर आरोप
सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे विभागीय आयुक्त काँग्रेस गटनोंदणीस जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. यामुळे महापौर निवडणुकीत काँग्रेसचे सहा नगरसेवक वंचित राहण्याची शक्यता असून, गटनोंदणी न झाल्यास आंदोलन व न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.
Web Summary : Congress discusses Chandrapur mayor post; Dhanorkar faction likely to get it. Alliances with Uddhav Sena considered. Factionalism over group leadership delays decision.
Web Summary : कांग्रेस चंद्रपुर महापौर पद पर चर्चा कर रही है; धानोरकर गुट को पद मिलने की संभावना है। उद्धव सेना के साथ गठबंधन पर विचार। गुट नेतृत्व पर खींचतान से निर्णय में देरी।