लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून यापूर्वी पाच वाघिणीला ओडिसा आणि महाराष्ट्रातील नवेगाव व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित केले होते. आता पुन्हा आठ वाघिणींना स्थलांतरित करणार असल्याची माहिती आहे.
वाघांच्या वाढत्या संख्येमुळे अधिवास क्षेत्र कमी पडत आहे. यातून मानव-वन्यजीव संघर्ष वाढले तसेच मागील चार वर्षात वाघांच्या झुंजीत आठ वाघांचा मृत्यू झाला. काही वाघ गंभीर जखमी झाले. दोन वाघांच्या झुंजीत कोर क्षेत्रातील दोन तर बपर क्षेत्रातील सहा वाघांचा मृत्यू झाला. हे टाळण्यासाठी व वाघांच्या सुरक्षित अधिवासासाठी स्थानांतरित करणे हाच उपाय आहे. मागील दोन वर्षांत ताडोबातील पाच वाघिणींना स्थानांतरित करण्यात आले. त्यामध्ये ओडिसातील सिम्बलीपाल येथे दोन मादी आणि अन्य प्रकल्पांत तीन वाघ स्थानांतरित करण्यात आले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या तीन वाघ आहेत. मात्र, एकही वाघीण नाही. वाघांची संख्या वाढविण्यासाठी मादी वाघांची गरज आहे. यावर पर्याय म्हणून ताडोबातून दोन ते तीन वर्षे वयोगटातील आठ वाघिणींची मागणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने केली आहे. सध्या त्यातील दोन वाघिणींच्या स्थलांतरणासाठी केंद्राकडे परवानगी मागण्यात आली आहे.
"ताडोबा तेथील कोर क्षेत्रात वाघांची संख्या अधिक आहे. वाढत्या संख्येने आणि अधिवास क्षेत्र कमी असल्याने अनेकदा वाघांमध्ये झुंजी होतात. त्यामध्ये वाघ जखमी किंवा मृत्यू होऊ शकतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने ताडोबातून आठ वाघिणींची मागणी केली, हे खरे आहे."- शंभू नाथ शुक्ल, क्षेत्रसंचालक, ताडोबा व्याघ्र प्रकल्प