जंगली प्राण्यांची गावाकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST2021-02-06T04:50:35+5:302021-02-06T04:50:35+5:30
सिंचन सुविधा उपलब्ध करा पोंभुर्णा : तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्यामुळे ते दुबार पिकांपासून वंचित आहेत. ...

जंगली प्राण्यांची गावाकडे धाव
सिंचन सुविधा उपलब्ध करा
पोंभुर्णा : तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्यामुळे ते दुबार पिकांपासून वंचित आहेत. त्यामुळे तालुक्यात सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, धान उत्पादनासाठी हा तालुका प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी मोठे नुकसान झाले आहे.
बेरोजगारांमध्ये नैराश्य
वरोरा : परिसरात मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार असून त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते नैराश्यात सापडले आहेत. त्यामुळे या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी परिसरात उद्योगाची निर्मिती करावी, अशी मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे.
माकडांमुळे कवेलूंचे नुकसान
राजुरा : ग्रामीण भागात आजही कवेलूची घरे बघायला मिळतात. मात्र मागील काही दिवसापासून तालुक्यातील काही गावांमध्ये माकडांना हैदोस घातला असून कवेलूच्या घरांचे मोठे नुकसान करीत आहेत. त्यामुळे वनविभागाने नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
खताच्या ढिगाऱ्यामुळे डासांचे प्रमाण वाढले
चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या दाताळा, कोसारा, देवाळा आदी गावातील रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. वादळवारा आल्यास केरकचरा रस्त्यावर येतो. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे ढिगारे हटविण्याची मागणी केली जात आहे.
उघड्या जनित्रामुळे अपघाताचा धोका
चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, पोंभुर्णा आदी तालुक्यातील काही गावामध्ये विद्युत वाहिनीच्या जनित्राचे दार उघडे असल्याने अपघाताची शक्यता आहे. याकडे विभागाने लक्ष देऊन जनित्राचे दार बंद करावे, अशी मागणी केली जात आहे.
वीज खांबामुळे अपघाताचा धोका
चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले वीज खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे.
ओपन स्पेस बनले कचऱ्याचे केंद्र
चंद्रपूर : शहरातील बहुतांश वॉर्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट उभारण्यात आले. मात्र या ओपन स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने यामध्ये कचरा टाकला जात आहे. महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
शौचालयाचा गैरवापर
चंद्रपूर : परिसरातील अनेक गावात गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने शौचालयाचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे.