Wife kills husband ; show off as committed suicide | सतत भांडणाऱ्या नवऱ्याची बायकोने केली हत्या; बनाव आत्महत्येचा केला

सतत भांडणाऱ्या नवऱ्याची बायकोने केली हत्या; बनाव आत्महत्येचा केला

लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : भद्रावती शहरातील किल्ला वार्ड येथे राहणाऱ्या इसमाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ही बनाव असून प्रत्यक्षात त्याचा खून त्याच्या पत्नीनेच केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
प्रणाली गणेश वाटेकर (२५) रा. किल्ला वॉर्ड असे आरोपीचे नाव असून तिने आपला पती गणेश उर्फ अतुल वाटेकर याचा खून केल्याची कबुली दिली आहे. दोन वर्षांपूर्वी या दोघांचा विवाह झाला होता. त्यांना १५ महिन्यांची मुलगी आहे. विवाहानंतर पती कमी व पत्नी जास्त शिकलेली यावरून तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांच्यात भांडणे होत असत. या काळात आरोपी आपल्या माहेरीही बरेचदा निघून गेली होती. काही दिवसांपूर्वी गणेश हा त्याच भागात वेगळा राहू लागला होता. २१ मे रोजी रात्री १२ च्या सुमारास प्रणालीने आपल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केलची माहिती दिली. मात्र गणेशचा धाकटा भाऊ हेमंत याने आपल्या भावासोबत काही घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा व प्राथमिक अहवाल याआधारे चौकशी सुरु केली. प्रणालीने काही वेळेस उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली व तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे दोन्ही हात बांधून त्याच्या गळ्यावर दुपट्टा आवळून व त्याच्या नाकातोंडावर उशी ठेवून त्याला ठार केल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

 

Web Title: Wife kills husband ; show off as committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.