अप्पर तळोधी तहसील कार्यालय रामभरोसे झाले आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे जबाबदार अधिकारी नसल्याने दिवसा व रात्रभर अवैध गौण खनिजाची वाहतूक होत असतानासुद्धा कारवाई केली जात नाही. या तालुक्यात कुठल्याही रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना रोज रात्रभर रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टर व हायवाने रेतीची शासकीय कामावर व नवीन प्लँटवर रेती टाकली जात आहे. महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारीवर्गाशी हातमिळवणी करून रेती तस्कर मालामाल होत आहेत. याठिकाणी सामान्य कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मातीची गरज लागली तर त्याच्या वाहनावर महसूल विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, वर्षभर रेती व मुरूमाची तस्करी करणाऱ्या वाहनधारकांवर अजूनपर्यंत कारवाई केली जात नसल्याने रेती तस्कर सैराट झाले आहे. हा प्रकार बंद करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागभीड शिवसेना उपतालुका प्रमुख मनोज वाढई यांनी दिला आहे.
तळोधी परिसरात सर्रास रेती तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST