लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मधुमेह (डायबिटिज) असलेल्या रुग्णांनी नियमित डोळे तपासणी करणे अत्यावश्यक आहे. या रुग्णांच्या डोळ्यांमध्ये विविध गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वेळोवेळी तपासणी करून औषधोपचार केल्यास, डोळ्यांना सुरक्षित ठेवता येते. डायबिटिज रेटिनोपॅथीचा धोका कमी करण्यासाठी धूम्रपान टाळणे, रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे, नियमित व्यायाम करणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे, औषधे नेमके घेणे आवश्यक आहे. डायबिटिज रेटिनोपॅथी हे डायबिटिजमुळे डोळ्यांच्या रेटिना (डोळ्याच्या पाठीमागे असलेल्या हलक्या पेशी असलेल्या अवयव) मध्ये होणारे नुकसान आहे. हे नुकसान, सुरुवातीच्या टप्प्यात, साधारणतः दिसत नाही. मात्र, वेळेवर उपचार न केल्यास यामुळे पूर्णपणे डोळेदेखील खराब होऊ शकतो, त्यामुळे वेळीच उपचार करून आपली दृष्टी योग्य ठेवणे गरजेचे आहे. अशा रुग्णांनी आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देवून आजारावर नियंत्रण ठेवणे तसेच वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्यानुसार औषधोपचार करणे आवश्यक आहे
तपासणी केव्हा करावीडायबिटिजचे रुग्ण असेल विविध लक्षणांचा अनुभव होत असेल तर त्वरित रेटिना स्पेशालिस्टला भेटावे. यासोबतच डायबिटिज असलेल्या रुग्णांनी नियमित डोळ्यांची तपासणी करावी.
ही आहे लक्षणेदृष्टी धुसर होणे: डोळ्यांची दृष्टी कमी होणे किंवा धूसर दिसणे, रात्री कमी दिसणे, रात्री किंवा कमी प्रकाशात दिसायला त्रास होणे, दृष्टीत काळे किंवा रंगीबेरंगी डाग दिसणे, विशेषतः वाचन करताना किंवा एखाद्या गोष्टीकडे पाहताना डाग दिसू शकतात. दृष्टी अचानक वाईट होणे, काही लोकांना अचानक डोळ्यांची दृष्टी नष्ट होणे, डोळ्यातून पाणी येणे किंवा रक्तस्राव होणे, रक्तवाहिन्यांमध्ये फाटलेल्या ठिकाणांमुळे डोळ्यातून रक्त येऊ शकते. त्यामुळे वेळीच उपचार करणे महत्त्वाचे आहे.
"डोळ्यांची नियमित तपासणी करणे निगा राखणे गरजेचे आहे. विशेषतः डायबिटिज रुग्णांनी ही तपासणी नियमित करावी. डायबिटिज रेटिनोपॅथीचा धोका कमी करण्यासाठी धूम्रपान टाळणे, रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. योग्य उपचार घेतल्यास आजारावर मात करता येते."- डॉ. भूषण उपलंचिवार, नेत्ररोगतज्ज्ञ, चंद्रपूर