काटेरी पिंजऱ्यात आक्रंदने विरतात तेव्हा ...
By Admin | Updated: February 9, 2015 23:09 IST2015-02-09T23:09:07+5:302015-02-09T23:09:07+5:30
आयुष्याच्या एका वळणावर चुकीची पावलं पडली अन् अख्खी जिंदगानीच काळवंडून गेली. काटेरी पिंजऱ्यात अडकलेल्या ‘त्या’ अबलांचं आक्रंदन पिंजऱ्यातच विरलं आहे. वासनेनं बरबटलेल्या विद्रुप

काटेरी पिंजऱ्यात आक्रंदने विरतात तेव्हा ...
रुपेश कोकावार - बाबुपेठ (चंद्रपूर)
आयुष्याच्या एका वळणावर चुकीची पावलं पडली अन् अख्खी जिंदगानीच काळवंडून गेली. काटेरी पिंजऱ्यात अडकलेल्या ‘त्या’ अबलांचं आक्रंदन पिंजऱ्यातच विरलं आहे. वासनेनं बरबटलेल्या विद्रुप घटकांच्या दुनियेत जगणाऱ्या या असहाय्य महिलांचा आक्रोश मात्र कुणाच्याच कानापर्यंत पोहचत नाही. बदनाम वस्तीत पडत, धडपडत, ठेचकाळत जगणाऱ्या या महिलांची व्यथाच निराळी आहे.
घरच्या प्रतिकूल परिस्थितीनं जगणं नकोसं झालं...नेमकी हिच संधी साधून देहविक्रीच्या व्यवसायातील दलालांनी त्यांना हेरलं. विविध आमिष दाखविली. आणि चंद्रपुरच्या कुंटणखान्यात त्यांंना आणल्या गेलं. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात आहे. अनेकींनी सुरुवातीला विरोध केला. मात्र त्यांचा आक्रोश तेथेच दाबल्या गेला. आता त्यातील अनेकजणी वस्तीलाच शरण गेल्या आहेत. या काटेरी पिंजऱ्यातून मुक्त होण्याची आसही संपली आहे. ईच्छेविरूद्ध होत असलेलं शोषण सहन करण्यापलिकडे आता त्यांच्या हाती काहीच उरले नाही.
बालपणी बाहुल्यांसोबत खेळत असताना भविष्यात आपल्या नशिबी असा भयाण काळोख असेल, अशी कल्पनाही त्यांनी कधी केली नसेल.
कुंटणखान्यात दाखल झालेल्या काही युवतींनी सुरुवातीला होत असलेल्या शोषणाला विरोध केला; परंतु त्यांच्या मदतीला कुणीही धावून आले नाही. त्यानंतर आपल्याच नशिबाला दोष देत त्या आजही तेथेच जगत आहेत. या वस्तीत ५० ते ६० महिला, मुली देहविक्रीचा व्यवसाय करतात. त्यांपैकी काहीजणींकडून जबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची चर्चा आहे.
तडजोड करून जगताना कुणी मिनलची मोना झाली तर कुणी राणीची रोमा...! तेथील अन्य मुली त्यांच्या संवगडी बनल्या अन् मालकीन ‘अम्मा’ बनली.
स्थनिक वेश्या अड्डयावर आंध्रप्रदेश तसेच मराठवाड्यातील ५० ते ६० मुली वेश्या व्यवसायात गुंतल्या आहेत. त्या तेथे कशा आणि कुठून आल्यात, याचा शोध घेण्याची गरज कुणालाच वाटली नाही. या व्यवसायात गुंतणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत आहे. त्या स्वखुशीने या व्यवसायात आल्यात की त्यांना यात जबरीने गोवल्या गेले, याचा शोध पोलीस यंत्रणाही घेताना दिसत नाही. या वस्तीवर गुन्हेगारांचे वर्चस्व आहे. त्या मुलींना मुक्त करण्यासाठी गेल्यानंतर हिंसा होईल, या भीतीपोटी कोणत्याही सामाजिक संस्था या भानगडीत पडत नाही. नेमकी ही बाब या व्यवसायाला पुरक ठरत आहे. मागील वर्षी याच परिसरात आंध्रप्रदेशातील चार मुलींना घर कामाचे आमिष दाखवून येथे आणल्या गेले होते. पंरतु काही दिवसातच त्यातील एकीने तेथून पळ काळत पोलिस ठाणे गाठल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर चारही मुलींना कुंटणखान्यातून मुक्त करण्यात पोलिसांना यश आले. वेश्याव्यवसायातून बाहेर पडल्यानंतर समाज पुन्हा आपल्याला स्वीकारणार नाही, या भीतीपोटीही अनेकजणी होणारा अत्याचार मूकपणे सहन करीत आहेत.