कोविड रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडतो तेव्हा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST2021-04-20T04:29:32+5:302021-04-20T04:29:32+5:30

चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयाच्या एका वॉर्डातील ऑक्सिजनचा पुरवठा रविवारी मध्यरात्री अचानकपणे बंद पडल्याने एकच तारांबळ ...

When the oxygen supply to Kovid Hospital is cut off ...! | कोविड रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडतो तेव्हा...!

कोविड रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडतो तेव्हा...!

चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयाच्या एका वॉर्डातील ऑक्सिजनचा पुरवठा रविवारी मध्यरात्री अचानकपणे बंद पडल्याने एकच तारांबळ उडाली. ही बाब माहिती होताच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांची सतर्कता बाळगून यंत्रणा हलविल्याने रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत सुरू झाला. पुढचा अनर्थ टळल्यामुळे रुग्णांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.

कोरोनाने अख्खे जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. या परिस्थितीत जगणे हाच एकमेव पर्याय प्रत्येकजण निवडताना दिसत आहे. मात्र एकदा कोरोनाची लागण झाल्यानंतर अचानक रुग्णाला श्वासोच्छ‌्वास घेणे अवघड झाले की, तो रुग्णालयाची वाट धरतो. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की रुग्णालयात भरती होण्यासाठी खाट मिळत नाही. ऑक्सिजन वा व्हेंटिलेटर दूरची गोष्ट. या गोष्टी न मिळाल्याने रुग्ण उपचाराविनाच दगावत आहे. खाट मिळाली, ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधाही आहे. आणि अशातच रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा बंद झाला तर याची कल्पनाच न केलेली बरी. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये रविवारच्या रात्री सुमारे १ वाजता घडला. ही बाब लक्षात येताच रुग्ण भयभीत झाले. ऑक्सिजनची सुविधा असताना नाहक जीव जातो की काय, अशी अवस्था रुग्णांची झाली. आरोग्य यंत्रणाही हादरली. अशातच मदतीसाठी इकडे तिकडे फोन करणे सुरू झाले. ही वेळ गाढ झोपेची असते. मदतीला कोण धावून येईल हाही प्रश्नच. ही माहिती चंद्रपूचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यापर्यंत पोहोचली. हे ऐकून त्यांनाही धक्काच बसला. त्यांनी लगेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सुरपाम यांच्या कानावर ही बाब टाकली तर ते स्वतः आजारी असून, नागपुरात उपचार घेत असल्याचे समजले. आमदार जोरगेवार यांनी त्यांच्या अधिनस्त डॉ. सोनारकर यांच्याशी चर्चा करून यंत्रणा हलविली. सुदैवाने काही वेळातच ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला आणि रुग्णांचा जिवात जीव आला.

बाॅक्स

जिवात जीव आला, मोठा अनर्थ टळला

रात्री आमदार किशोर जोरगेवार यांनी सतर्कता बाळगून यंत्रणेला सजग केल्याने पुढचा अनर्थ टळला. हा प्रकार हाताळण्यात दिरंगाई झाली असती तर याची कल्पनाच न केलेली बरी. भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्नितांडवानंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले, अशातच असे प्रकार यात भर घालणारेच असल्याचे नाकारता येत नाही.

कोट

रात्री १ वाजताच्या सुमारास मला काही रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांचे फोन आले. वॉर्ड नंबर ३ मध्ये ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याचे सांगण्यात आले. ही गंभीर बाब लक्षात येताच तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता ऑक्सिजनचा पुरवठा बरोबर होत नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सुरपाम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वेगळ्या आजाराने नागपुरात भरती असल्याचे सांगितले. नंतर त्यांचे अधिनस्त डॉ. सोनारकर यांच्याशी संपर्क साधून हालचाली केल्यानंतर ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत झाला. यामुळे मोठा अनर्थ टळला.

- किशोर जोरगेवार, आमदार, विधानसभा मतदारसंघ, चंद्रपूर

Web Title: When the oxygen supply to Kovid Hospital is cut off ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.