वर्ध्यात झाले ते चंद्रपुरात का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST2021-04-20T04:29:23+5:302021-04-20T04:29:23+5:30
चंद्रपूर : मागील काही दिवसापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेडसुद्धा मिळत नसल्याची स्थिती आहे. ...

वर्ध्यात झाले ते चंद्रपुरात का नाही?
चंद्रपूर : मागील काही दिवसापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेडसुद्धा मिळत नसल्याची स्थिती आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य सेवेवर अतिरिक्त ताण आला आहे. अशीच स्थिती वर्धामध्येही आहे. येथील प्रशासनाने आवाहन केल्यानुसार खासगी डाॅक्टरांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आठवड्यातील काही दिवशी शासकीय रुग्णालयातील कोविड रुग्णांवर उपचार करणार आहे. यासाठी त्यांनी वेळापत्रकही ठरवून दिले आहे. त्यानुसारच चंद्रपूर जिल्ह्यातील खासगी डाॅक्टरांनी शासकीय रुग्णालयांमध्ये वेळातवेळ काढून सेवा दिल्यास आपल्याही जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा मिळेल, असा सूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आहे.
सध्या जिल्ह्यात ११ हजारांवर रुग्ण ॲक्टिव असून आजपर्यंत ६०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोबतच दररोज १ हजार ते १ हजार ५०० नव्या रुग्णांची भर पडत आहे. यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच कोलमडल्यासारखी अवस्था झाली आहे. अस्तित्वात असलेल्या साहित्यावर रुग्णांवर उपचार केले जात आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आता जिल्हा प्रशासनाने पदभरतीची जाहिरात काढून यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तत्काळ पद भरतील याची शाश्वती नाही. दरम्यान, वर्धा जिल्ह्यातही चंद्रपूरसारखी स्थिती होती. यावर उपाय म्हणून तेथील जिल्हा प्रशासनाने खासगी डाॅक्टरांना शासकीय रुग्णालयात सेवा देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला तेथील डाॅक्टरांनी सामाजिक बांधिलकी म्हणून प्रतिसाद देत जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी एक वेळापत्रक ठरवून दिले असून त्या त्या दिवशी खासगी डाॅक्टर आपली शासकीय रुग्णालयात सेवा देणार आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी खासगी डाॅक्टरांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक डाॅक्टरांचे नाव तसेच ते ज्या दिवशी सेवा देणार आहे याचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे. अशीच सेवा जर चंद्रपूर जिल्ह्यातील खासगी डाॅक्टरांनी दिली तर येथीलही रुग्ण तसेच मृत्युदर कमी होण्यास मदत होईल, अशी भावना सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बाक्स
११३ पदाची होणार भरती
रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आणि आरोग्य सेवेवर ताण पडत असल्यामुळे विविध पदांसाठी जिल्हा परिषद कंत्राटी पदभरती करणार आहे. या पदभरतीमध्ये हाॅस्पिटल मॅनेजरच्या १५ जागा, फिजिशियन ११,ॲनेस्थेटिस्ट ११, मेडिकल ऑफिसर ३४, स्टाॅप नर्स १८ लॅब टेक्निशिअन ९, स्टोअर्स ऑफिसर १५, एएनएम अशा प्रकारे जाहिरात काढून २० एप्रिलपर्यंत अर्ज देण्याची मुदत देण्यात आली आहे.