घरी जाऊन जेवण केले आणि तो पोहायला गेला.. पुढे अघटित घडले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 13:11 IST2020-07-17T13:10:55+5:302020-07-17T13:11:15+5:30
सम्यक शेतावरुन एकटाच घरी आला होता. काकाकडे जेवण केले. आणि सायकलने गावालगतच्या नदीवरील हत्ती गोटा बंधाऱ्यावर गेला. त्यानंतर त्याने कपडे काढून आंघोळीसाठी बंधाऱ्यातील पाण्यात उडी मारली.

घरी जाऊन जेवण केले आणि तो पोहायला गेला.. पुढे अघटित घडले...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास किटाळी (तू.) गावालगतच्या हत्ती गोटा बंधाऱ्यावर घडली.
सम्यक चंद्रशेखर पाटील रा. किटाळी (तु) असे मृतक मुलाचे नाव आहे. सम्यक सकाळी ८ वाजता आईसोबत शेतावर गेला होता. वडील दुसऱ्यांकडे रोजंदारीने गेले होते. भूक लागली म्हणून सम्यक शेतावरुन एकटाच घरी आला होता. काकाकडे जेवण केले. आणि सायकलने गावालगतच्या नदीवरील हत्ती गोटा बंधाऱ्यावर गेला. त्यानंतर त्याने कपडे काढून आंघोळीसाठी बंधाऱ्यातील पाण्यात उडी मारली.
मात्र पाणी अधिक असल्याने तो खोल पाण्यात बुडाला. बराच वेळ होऊनही सम्यक पाण्यातून बाहेर आला नाही म्हणून त्याच्यासोबत असलेले मित्र घाबरले. त्यांनी गावाकडे धूम ठोकली. एका तासानंतर सम्यकचा मृतदेह किटाळी पुलाजवळ वाहत येऊन पुलाला अटकला. पुलावर काही मुली खेळत होत्या. त्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी लगेच गावकऱ्यांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.