एका डॉक्टरवर ४२ गावांचा भार
By Admin | Updated: September 3, 2014 23:17 IST2014-09-03T23:17:16+5:302014-09-03T23:17:16+5:30
पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद ठिकरे यांची चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयामध्ये बदली झाल्याने कार्यरत डॉ. विलास धनगे यांच्यावर तालुक्यातील

एका डॉक्टरवर ४२ गावांचा भार
देवाडा खुर्द : पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद ठिकरे यांची चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयामध्ये बदली झाल्याने कार्यरत डॉ. विलास धनगे यांच्यावर तालुक्यातील ४२ गावांतील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी येऊन पडली आहे. परिणामी ते मानसिक तणावाखाली काम करीत असून त्यामुळे रुग्णसेवेकडे दुर्लक्ष होत आहे.
अतिमागास आणि आदिवासीबहुल असलेल्या पोंभुर्णा तालुक्यातील गावागावांत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. याठिकाणी तालुक्यातील ४२ गावांतील ३५ हजार रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेतात. या प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजुर आहेत. त्यांपैकी वैद्यकीय अधिकारी डॉ. ठिकरे यांची नुकतीच चंद्रपूर येथे बदली झाली असून यापूर्वी या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉ. सरोज पुल्लकवार यांना मागील वर्षापासून चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी फिरत्या आरोग्य पथकावर डेप्युटेशनवर ठेवण्यात आले. त्यामुळे डॉ. विलास धनगे यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या ४२ गावांतील नागरिकांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी येवून पडली आहे. परिणामी त्यांना पोलीस विभागातील आरोपीची वैद्यकीय तपासणी, प्रसुती, रुग्ण तपासणी, रात्रीच्या वेळी आपत्कालीन तपासणी, शवविच्छेदन (पीएम) अशा विविध कामांमुळे डॉ. धनगे यांच्यावर ताण पडत आहे. तालुक्यातील संपूर्ण आरोग्य सेवेचा ताण येत असल्याने त्यांना मानसिक तणावाखाली काम करावे लागत आहे. त्याचा त्रास परिसरातील रुग्णांना होत आहे. रुग्णांना आवश्यक आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. तालुक्यात सध्या अनेक साथीचे आजार सुरू असून पोंभुर्णा येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये डेंग्युसदृश्य आजाराची साथ सुरू झाली आहे. त्यामुळे एकट्या वैद्यकीय अधिकाऱ्याची संबंधित रुग्णांवर उपचार करताना चांगलीच तारांबळ उडत आहे. परिणामी पाहिजे त्या प्रमाणात परिसरातील रुग्णांना उपचार याठिकाणी मिळत नसल्याने अनेक रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
आधीच या तालुक्यात कोणताही उद्योग नसल्याने फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून तरुण वर्ग रिकाम्या हाताला काम मिळत नसल्याने बेरोजगार होवून भटकत आहेत. या तालुक्यात सिंचनाची कुठलीही सोय नसल्याने केवळ निसर्गावर अवलंबून शेती करावी लागत असून परिणामी दरवर्षी धान उत्पादनात कमालिची घट येत असल्याने स्थानिक शेतकरी दारिद्र्याच्या जीवन जगत आहे. अशातच आरोग्यासाठी खर्च कुठून करायचा, या विवंचनेने नागरिक हतबल झाले आहेत. (वार्ताहर)